
पिळोदे येथे शुद्ध पाण्यासाठी ‘ॲक्वा प्लांट’ उभारा, अन्यथा ७ जुलैपासून उपोषणाचा दिला इशारा
आदिवासी पारधी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिळोदे येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध आणि दररोज ‘ॲक्वा’चे पाणी मिळावे, या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे अमळनेर तालुकाध्यक्ष अविनाश गोरख पवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवून ‘ॲक्वा प्लांट’ न उभारल्यास येत्या ७ जुलै २०२६ रोजी पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अविनाश पवार यांच्या आई पद्माबाई गोरख पारधी ह्या मागील ५ वर्षांपासून पिळोदे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावातील नागरिकांना वेळेवर आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसल्याने, प्रत्येक मिटिंगमध्ये तोंडी स्वरूपात ‘ॲक्वा’ बसविण्याची मागणी लावून धरली होती. परंतु, आजतागायत ग्रामपंचायतीने यावर कोणतीही दखल घेतलेली नाही. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. जळगाव), तहसीलदार (अमळनेर) आणि पोलीस निरीक्षक (अमळनेर पोलीस स्टेशन) यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
आरोग्याचा धोका टाळण्यासाठी मागणी
गावामध्ये शुद्ध पाण्यासाठी ॲक्वा प्लांट उभारल्यास नागरिकांना दररोज शुद्ध पाणी मिळेल, ज्यामुळे लहान मुले व नागरिकांच्या आरोग्याचा धोका टाळता येईल. तसेच, यातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे एक साधनही उपलब्ध होऊ शकते, असे निवेदनात नमूद केले आहे.
७ जुलै रोजी उपोषणाचा इशारा
या पत्राची प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन पिळोदे येथे तात्काळ ॲक्वा प्लांट लावावा. जर या अर्जाची दखल न घेतल्यास आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार न केल्यास, ७ जुलै २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात नाइलाजास्तव उपोषणास बसावे लागेल, असा इशारा अविनाश पवार यांनी दिला आहे. तसेच या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply