अमळनेरच्या जगदीश पाटील यांचा ‘उत्कृष्ट महसूल कर्मचारी’ पुरस्काराने गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील लिपिक जगदीश पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीबद्दल ‘जळगाव जिल्हा उत्कृष्ट महसूल कर्मचारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जगदीश पाटील यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जगदीश पाटील यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट महसूल कर्मचारी पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे. विशेष म्हणजे महसूल विभागात कमी वयात विविध स्तरांवर चार वेळा उत्कृष्ट महसूल सहाय्यक पुरस्कार मिळविणारे ते जिल्ह्यातील पहिले कर्मचारी ठरले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीची या निमित्ताने जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली. जगदीश पाटील यांना यापूर्वी सन २०२०-२१ मध्ये तहसीलदार, पारोळा यांच्याकडून उत्कृष्ट महसूल सहाय्यक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सन २०२१-२२ मध्ये जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडून त्यांना पुरस्कार मिळाला. सन २०२४-२५ मध्ये उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या हस्ते त्यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. आता सन २०२५-२६ मध्ये जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडून जिल्हास्तरीय उत्कृष्ट महसूल कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या पुरस्कारांची संख्या चार झाली आहे. महसूल विभागातील दैनंदिन कामकाजात नागरिकांच्या विविध अडचणी सोडविणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे, जबाबदारीने काम करणे आणि नागरिकांना वेळेत सेवा देण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांची उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली. प्रामाणिक कामगिरी, जनसेवेची वृत्ती आणि शासकीय कामातील पारदर्शकता या गुणांची पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली.

 

अमळनेरच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांचाही गौरव

 

यावर्षी अमळनेर तहसील कार्यालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार मिळाल्याने अमळनेरच्या महसूल विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तलाठी कल्पेश कुवर, अव्वल कारकून विद्या पाटील आणि शिपाई सुभाष मोरे यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकाच वर्षी अमळनेर तहसील कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याने महसूल विभागात समाधानाचे वातावरण आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे अमळनेर तालुक्यातील नागरिक, महसूल विभागातील सहकारी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *