स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल; विद्यालयातून सिद्धी पाटील प्रथम

अमळनेर (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये मार्च महिन्यात झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा शाळेचा दबदबा कायम राखला आहे.

यंदाही शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत गुणवत्तेची छाप पाडली आहे. या परीक्षेत सिद्धी भानुदास पाटील हिने ९६.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चैतन्य वारके हिने ९६.२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निशा पाटील व मानसी पाटील यांनी प्रत्येकी ९५.८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. शाळेच्या एकूण ४० विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून १९ विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्कृष्ट श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या यशामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे. या यशाबद्दल शाळेचे मार्गदर्शक बजरंगजी अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, अध्यक्षा सीतिका अग्रवाल, व्यवस्थापन सदस्या ममता अग्रवाल, आचल अग्रवाल, चेअरमन डी. डी. पाटील तसेच मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. शाळेतील शिक्षकांनी नियमित सराव परीक्षा व मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांची भक्कम तयारी करून घेतल्यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक पद्धतीचे व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. या घवघवीत निकालामुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात अव्वल ठरले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *