
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा जनक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात वास्तव्यास असलेले मुकुंदराव सपकाळे हे सेवाभावी वृत्तीने सामाजिक कार्य करत असून गोरगरीब जनतेसाठी सतत परिश्रम घेत असतात. अशा माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीवर भरदिवसा झालेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच दगडफेक करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तसेच जळगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच मुख्य आरोपी व त्यांच्या साथीदारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, प्रा. सुभाष पाटील, बन्सीलाल भागवत, अशोक बिऱ्हाडे, बाळासाहेब संदानशिव, अतुल डोळस, हदयनाथ मोरे, पुरुषोत्तम माळी, महादू बैसाणे, अरुण देशमुख, चंद्रकांत बिऱ्हाडे, आत्माराम अहिरे, समाधान मैराळे (पत्रकार) आदी उपस्थित होते.

Leave a Reply