३५० लेखणींना मिळाली नवी उभारी; कथा-कविता अन् बातमी लेखनाची कार्यशाळा

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र (धुळे) यांच्या वर्धापन दिनानिमित्त खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र, शाखा-अमळनेर यांच्या वतीने येथील साने गुरुजी कन्या विद्यालयात कथा, कविता व बातमी लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत तब्बल ३५० विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशील लेखनाला नवी दिशा दिली.

कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनिता बोरसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात खान्देशाचे आराध्य दैवत गौराई पूजनाने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गोकुळ बागुल यांनी कथा लेखनाचे विविध प्रकार, कथानकाची मांडणी, पात्ररेखा तसेच कथा अधिक रंजक करण्याच्या पद्धतींबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कवी तथा गझलकार डॉ. कुणाल पवार यांनी कविता लेखनाचे प्रकार, आशय, ओघवती भाषा आणि प्रभावी शैली याबाबत मार्गदर्शन केले. दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार उमेश काटे यांनी बातमी लेखनाचे नियम, बातमीची रचना, पत्रकारितेच्या विविध पायऱ्या तसेच बातमी लेखनाची सूत्रे याबाबत सविस्तर माहिती दिली.

मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनी लेखनाकडे निश्चितच प्रवृत्त होतील, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थिनींना विद्यालयाच्या वतीने सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खान्देश साहित्य संघाच्या तालुकाध्यक्षा सुनिता रत्नाकर पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. खान्देश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. यावेळी खान्देश साहित्य संघाच्या सदस्या सीमा पाटील, आर. एम. देशमुख, मोनाली वंजारी, मनिषा वैद्य, धनश्री साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश पाटील यांनी केले, तर खान्देश साहित्य संघाचे सचिव गोपाल हडपे यांनी आभार मानले. दिनकर पाटील व दानिश शेख यांनी कार्यशाळेस सहकार्य केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *