
नवीन मालमत्ता कर आकारणीविरोधात आवाज उठवण्याचे सोमचंद संदानशिव यांचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) नवीन मालमत्तांवर सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांच्यामार्फत करण्यात आलेल्या कर आकारणीच्या सुनावणीला सध्या टीपी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळीच एकत्र येऊन या कर आकारणीबाबत आवाज उठवावा, असे जाहीर आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
दि. १५ आणि १६ रोजी नवीन मालमत्तांवरील कर आकारणीच्या सुनावणीचे काम सुरू असल्याचे संदानशिव यांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या निविदेच्या माध्यमातून हे काम देण्यात आले होते. या प्रक्रियेत खाजगी व्यक्तींमार्फत कर आकारणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. सदर कर आकारणीबाबत नागरिकांना सवलत मिळण्याची मर्यादा केवळ दोन ते तीन टक्के असू शकते, अशी माहितीही त्यांनी आवाहनातून दिली आहे. तसेच शहरातील कॉलनी भागांमध्ये गटारी तर दूरच, अनेक ठिकाणी रस्तेही झालेले नसल्याचा अनुभव नागरिकांना येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या कर आकारणीबाबत वेळीच आवाज उठवला नाही, तर नागरिकांना नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे संदानशिव यांनी म्हटले आहे. कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना दिलेला मक्ता रद्द करून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून नव्याने मोजणी करून कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी एखाद्या समितीच्या माध्यमातून सदर कर आकारणी रद्द करण्यासाठी आंदोलन उभारावे, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कोअर प्रोजेक्ट कंपनीला देण्यात आलेल्या कामाचे पैसे अखेर नागरिकांनाच भरावे लागणार असल्याने या संपूर्ण विषयावर नागरिकांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

Leave a Reply