अमळनेर आगारातून नांदुरी गडासाठी जादा बस सेवा सुरू; भाविकांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी) नवरात्र व रामनवमीच्या पार्श्वभूमीवर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, राज्य परिवहन महामंडळाने अमळनेर आगारातून नांदुरी गडासाठी जादा बस सेवा सुरू केली आहे. दिनांक २७ मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमामुळे अमळनेर व पारोळा तालुक्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सप्तश्रृंगी देवीचा यात्रोत्सव सुरु झाला आहे. यासाठी अमळनेर आगारामार्फत बस सेवा सुरू करण्यात आली आहे.  या व्यवस्थेनुसार सकाळी ५:३० वाजल्यापासूनच जादा बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवास अधिक सुलभ व नियोजित झाला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही गावातून किमान ४० प्रवासी नांदुरी गडावर जाण्यासाठी तयार असतील, तर त्या गावातून थेट नांदुरी गडापर्यंत बस सोडण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील भाविकांना मोठा फायदा होणार असून, त्यांना थेट प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. या जादा बस सेवेत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच इतर सवलतीधारक प्रवाशांना सवलतीच्या दरात सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. दरम्यान, या विशेष बससेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी अमळनेर आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांनी केले आहे. धार्मिक वातावरणात वाढलेल्या गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही सेवा परिसरातील हजारो भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *