पत्रकाराच्या प्रयत्नांनी सहा दिवसांनी मृताची ओळख पटली; कुटुंबीयांना मिळाले अंतिम दर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) जुन्या बसस्थानक परिसरात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी एका अनोळखी पत्रकाराच्या प्रयत्नांमुळे त्यांची ओळख पटली. त्यामुळे कुटुंबीयांना आपल्या व्यक्तीचे अंतिम दर्शन घेता येऊन अंत्यसंस्कार करता आले. या संवेदनशील कार्याबद्दल अमळनेर पोलिसांनी त्या अनोळखी पत्रकाराचे आभार मानले आहेत.

याबाबत अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांनी माहिती दिली की, काही दिवसांपूर्वी जुन्या बसस्थानक परिसरात एक अनोळखी वृद्ध व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांना उपचारासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय तथा सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कोणतेही ओळखपत्र किंवा कुटुंबीयांशी संपर्क साधता येईल अशी माहिती नव्हती. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी तो शक्य तितका काळ सुरक्षित ठेवण्यात आला होता. पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस पथकाने सर्वतोपरी प्रयत्न करून शोध घेतला; मात्र त्यांना यश येत नव्हते. अखेर पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी सदर माहिती एका पत्रकाराला दिली. या पत्रकाराने उपलब्ध छायाचित्र आणि माहितीच्या आधारे बेटावद, धुळे आणि सुरत येथे माहिती प्रसारित केली. तसेच अनेक ठिकाणी संपर्क साधून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखेर यश आले. मृत्यूच्या तब्बल सहा दिवसांनंतर, ज्या दिवशी पोलीस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते, त्याच दिवशी मृताची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव पुनमचंद माधवराव पाटील (वय ६०, रा. दिंडोली, सुरत, गुजरात) असे निष्पन्न झाले. माहिती मिळताच पुनमचंद माधवराव पाटील यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा व मेहुणे देसले हे अमळनेर पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी आले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांनी सांगितले की, “सुरत येथील स्थानिक पत्रकारांमार्फत नातेवाईकांद्वारे आम्हाला माहिती मिळाली. तुमच्यामुळे आमच्या व्यक्तीवर आमचा शेवटचा हात पडू शकला. तर ” पोलीस दलाने म्हटले आहे की, आम्ही आमचे कर्तव्य केले, पण खरे आभार त्या अनोळखी पत्रकार बांधवाचे आहेत, ज्यांच्या प्रयत्नांमुळे कुटुंबाला त्यांच्या व्यक्तीचे अंतिम दर्शन घडू शकले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *