डॉ. समाधान मैराळे यांच्यावर खान्देश विभागाची धुरा; राज्य पत्रकार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील पत्रकार संघटन अधिक सक्षम व प्रभावी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि संघटन सरचिटणीस किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांच्याकडे खान्देश विभागाची धुरा देण्यात आली आहे. खान्देश विभागात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, या तिन्ही जिल्ह्यांतील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आगामी काळातील प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पत्रकारितेसोबतच डिजिटल माध्यमे, सामाजिक माध्यमे, मोबाईल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), माहितीची पडताळणी, फेक न्यूज आणि पत्रकारितेतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन तसेच कार्यरत पत्रकारांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यावरही भर दिला जाणार आहे.

पत्रकारांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी, शासकीय यंत्रणांशी समन्वय, पत्रकारांच्या व्यावसायिक कौशल्यविकासाच्या संधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील बदल यावर विभागीय पातळीवर सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

“खान्देशातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारितेची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न राहील. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल,” असे डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांनी सांगितले. डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांच्या निवडीमुळे खान्देश विभागातील पत्रकार संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी काळात विभागातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये संघटनात्मक उपक्रम, पत्रकार संवाद मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *