अमळनेर तालुक्यात दुर्दैवी घटनांची मालिका; दोघांचा पाण्यात बुडून, एकाचा चक्कर येऊन तर दोघांचा आजाराने मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) :  तालुक्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध दुर्दैवी घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील दहिवद आणि सावखेडा येथे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, एका व्यक्तीचा सायकलवरून शेतात जात असताना चक्कर येऊन मृत्यू झाला. याशिवाय दोन जणांचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सर्व प्रकरणांमध्ये अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  या सर्व घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.

 

दहिवद येथील बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला

 

दहिवद येथील बबन भिमराव पाटील (वय ६०) हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होते. रविवारी दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता त्यांचे पुतणे जगदीश शांताराम पाटील यांना ग्रामपंचायतीच्या विहिरीत बबन पाटील यांचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेची माहिती अमळनेर पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

 

सावखेडा येथे तापी नदीत बुडून युवकाचा मृत्यू

 

यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी निलेश मधुकर धनगर (वय २९) यांचा दि. १४ ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील तापी नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

 

शेतात जाताना चक्कर आल्याने मृत्यू

 

पैलाड येथील साईबाबा मंदिराजवळ राहणारे शिवाजी उत्तम पाटील (वय ४६) हे दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता सायकलवरून शेतात जात होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडून बेशुद्ध झाले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास उदय बोरसे करीत आहेत.

 

आजारपणामुळे दोघांचा मृत्यू

 

तालुक्यातील मंगरूळ येथील हेमंत विश्वास पाटील (वय ४४) यांचे दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता आजारपणामुळे निधन झाले. तसेच फरशी रोड परिसरातील समाधान बच्छाव (वय ३९) यांना दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजता छातीत दुखू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *