
ॲड. ललिता पाटील स्कूलचा दहावीचा १००% निकाल कायम; अक्षरा भामरे जिल्ह्यात आली पाचवी
अमळनेर (प्रतिनिधी) ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या २०२५-२६ परीक्षेत पुन्हा एकदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षीही शाळेने उत्कृष्ट निकाल देत पंचक्रोशीत आपला शैक्षणिक दबदबा सिद्ध केला आहे.
या निकालात शाळेची विद्यार्थिनी अक्षरा भामरे हिने ९८.२० टक्के गुण मिळवत अमळनेर–पारोळा विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच पलक पाटील हिने ९६.४० टक्के, मोहित पवार व नैतिक सेनानी यांनी प्रत्येकी ९५.२० टक्के, तर वैष्णवी माळी हिने ९४.४० टक्के गुण मिळवत प्रथम पाचमध्ये स्थान मिळवले आहे.
अक्षरा भामरे हिने इंग्रजी व माहिती तंत्रज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले, तर पलक पाटील हिने मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले.यावर्षी एकूण १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन व मेहनत महत्त्वाची ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, प्रा. देवेश्री तसेच प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Leave a Reply