विवाहित असूनही लग्नासाठी दबाव; बदनामीची धमकी देत फोटो प्रसारित केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी ) स्वतः विवाहित असूनही एका तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकणे, नकार दिल्यानंतर बदनामी करण्याची धमकी देणे तसेच बदनामीकारक फोटो नातेवाईकांना पाठवल्याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील वाकडी येथील अभिषेक तानाजी हटकर याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमळनेर येथील एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिषेक तानाजी हटकर हा सन २०१९ मध्ये तिला पाहण्यासाठी आला होता. मात्र त्यावेळी संबंधित तरुणीचे लग्न दुसऱ्या तरुणाशी झाले. त्यानंतर तिची पहिल्या पतीशी फारकत झाली. दरम्यान, सन २०२३ मध्ये अभिषेक तानाजी हटकर याने इन्स्टाग्रामद्वारे तरुणीशी संपर्क साधून तिच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला. मात्र तरुणीने त्यास नकार दिला. यानंतर तरुणीला अभिषेक तानाजी हटकर हा आधीच विवाहित असून त्याला अपत्य असल्याची माहिती मिळाली. त्यावर त्याने पत्नीपासून फारकत घेणार असल्याचे सांगत पुन्हा लग्नासाठी दबाव टाकला. तरुणीने पुन्हा नकार दिल्यानंतर त्याने तिचे बदनामीकारक फोटो आणि व्हिडीओ प्रसारित करण्याची, समाजात बदनामी करण्याची तसेच तिचे लग्न होऊ न देण्याची धमकी दिली. लग्न झाल्यास सासरी जाऊन बदनामी करेल, असेही त्याने सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तरुणीने त्याला स्पष्ट नकार देत अशा धमक्यांना घाबरत नसल्याचे सांगितले. त्यानंतर अभिषेक तानाजी हटकर याने तरुणीच्या मेहुण्याच्या मोबाईलवर बदनामीकारक फोटो पाठविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही तो न थांबता तरुणीच्या नातेवाईकांमध्ये तसेच कार्यालयातील सहकाऱ्यांकडे तिची बदनामी करत राहिल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दि. १८ मे २०२६ रोजी अभिषेक तानाजी हटकर याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी अभिषेकच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही संबंधित तरुणाकडून बदनामीचे प्रकार सुरूच राहिल्याने अखेर तरुणीने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अभिषेक तानाजी हटकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *