
मारवड येथे विवाहित तरुणाची आत्महत्या; गर्भवती पत्नीवर दुःखाचा डोंगर
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ९ तारखेला सकाळी उघडकीस आली. गौरव सुरेश पाटील (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी गौरवचे वडील सुरेश पाटील मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले असताना गौरवने घरातील मागील खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले. ही बाब लक्षात येताच शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी विजय भदाणे यांनी मारवड पोलिसांत दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. दरम्यान, मयत गौरवचे वडील सुरेश पाटील हे मूळचे चिंचोली येथील असून मारवड येथे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याने ते ‘डॉ. साठे’ म्हणून परिचित होते. गौरवचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता आणि तो मारवड येथील एका संस्थेत नोकरीला होता. त्याची पत्नी सध्या चार महिन्यांची गर्भवती असून या घटनेमुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply