गांधली येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक, ५० हजारांचे नुकसान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गांधली येथे विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांच्या शेतातील मका जळून खाक झाला. ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी घडली असून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गांधली येथील सुधाकर देशमुख व योगेश गुलाब देशमुख यांच्या गट क्रमांक १० मधून विद्युत तारा जात आहेत. विजेच्या खांबावरील तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी खाली पडली. ही ठिणगी शेतातील सुक्या मक्याच्या अवशेषांवर पडताच आग भडकली. काढून ठेवलेल्या मक्याच्या कणसांना व चाऱ्याला आग लागून काही वेळातच मोठे नुकसान झाले.

या आगीत दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील अंदाजे २२ ते २५ क्विंटल मका जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील रमेश न्हावी, भूषण देशमुख, बापू माळी आणि भूषण पारधी यांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग इतर शेतांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

दरम्यान, या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित यंत्रणांनी तातडीने पंचनामा करून वीज मंडळ व शासनामार्फत नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून विद्युत तारा व खांबांची वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *