संत ज्ञानेश्वरांच्या विचारांनी पैलाडमध्ये श्रोते मंत्रमुग्ध

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा, अमळनेर यांच्या वतीने संत साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमांतर्गत पैलाड येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात ज्येष्ठ अभ्यासक आ. सी. एस. पाटील यांचे “संत ज्ञानेश्वर : जीवन आणि कार्य” या विषयावर अभ्यासपूर्ण व रसाळ व्याख्यान झाले. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या विचारांचा आणि समाजप्रबोधनातील योगदानाचा उलगडा करताना पाटील यांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत बोलताना आ. सी. एस. पाटील यांनी संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा वेध घेतला. ज्ञानेश्वरीतील ओव्या, संतांचे अभंग आणि विविध ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून त्यांनी संत साहित्याची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली. त्यांच्या सखोल अभ्यासामुळे व्याख्यान ज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम ठरले. यावेळी बोलताना त्यांनी संत ज्ञानेश्वर हे केवळ अध्यात्मिक संत नव्हते, तर तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला विचारांनी हादरा देणारे कृतिशील समाजसुधारक होते, असे प्रतिपादन केले. वर्णव्यवस्था, जातिभेद, कर्मकांड आणि सामाजिक विषमता यांच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यांनी समता, करुणा आणि भक्तीचा मार्ग दाखविला. भागवत धर्माचा खरा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजमन जागृत करण्याचे कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. आज महाराष्ट्र ज्या संतपरंपरेचा अभिमान बाळगतो, त्याचे मोठे श्रेय संत ज्ञानेश्वरांना जाते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मोजक्या परंतु अभ्यासू आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानातून उपस्थितांना संत ज्ञानेश्वरांचे जीवन, कार्य आणि विचारांचा सखोल परिचय झाला. गावोगावी जाऊन संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उपक्रम स्तुत्य असून, समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अशा व्याख्यानमालेची आज अधिक गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब देशमुख यांनी केले, तर प्रा. ज्ञानेश्वर मराठे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) शाखा, अमळनेरचे अध्यक्ष संदीप घोरपडे होते. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गोकुळ पाटील तसेच अॅड. रामकृष्ण उपासनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेरचे पदाधिकारी, कीर्तनभूषण उपासनी महाराज, परिसरातील साहित्यप्रेमी, संतसाहित्य अभ्यासक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञान, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना शेवटी अनेक श्रोत्यांनी व्यक्त केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *