
निंभोरा गावाचा सुपुत्र झाला मीरा-भाईंदरचा उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा थक्क करणारा प्रवास
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा गावाचा सुपुत्र ध्रुवकिशोर पाटील मीरा-भाईंदरचा उपमहापौर झाले आहेत. त्यांचा संघर्षातून शिखरापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असाच आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा येथील मूळ रहिवासी असलेले मन्साराम पाटील हे सुमारे १९६४–६५ च्या काळात रोजगाराच्या शोधात मुंबई येथे गेले. खाजगी कंपनीत काम करत असताना पत्नीने घर व मुलांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. याच संस्कारातून मुलांना शिक्षणासोबतच लोकसेवेची ओढ लागली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ध्रुवकिशोर व त्यांचे बंधू संतोष पाटील यांनी उद्योग-व्यवसायात पाऊल टाकले. मात्र ध्रुवकिशोर पाटील यांनी लोकांची कामे करत-करत मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क उभा केला. सातत्य, मेहनत, कामातील शिस्त आणि नेतृत्वगुण यामुळे ते लवकरच नेत्यांच्या नजरेत आले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
सलग सहाव्यांदा नगरसेवक सन १९९९ पासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेत सलग सहा वेळा निवडून आलेले नगरसेवक म्हणून ध्रुवकिशोर पाटील यांची ओळख आहे. प्रत्येक कार्यकाळात त्यांनी संधीचे सोने करत विकासकामांचा ठसा उमटवला.
जनसंपर्क आणि सातत्य हेच बळ
सन १९९९ पासून आजतागायत ते सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवत आहेत. त्यांच्या प्रभागात गुजराथी व राजस्थानी समाजाची संख्या मोठी असली तरी मतदार असो वा नसो, कोणताही भेद न ठेवता ते प्रत्येकाचे काम निष्ठेने करतात. पूर्णवेळ जनसेवेसाठी समर्पित राहणे हीच त्यांची ओळख बनली आहे.
महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महानगरपालिकेत त्यांनी सभागृह नेता तसेच स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. प्रदीर्घ अनुभव व कार्यक्षमतेची दखल घेत पक्षाने नुकतीच त्यांच्यावर उपमहापौरपदाची जबाबदारी सोपविली आहे.
मताधिक्य कायम, विश्वास दृढ
प्रत्येक निवडणुकीत प्रभाग बदलूनही त्यांचे मताधिक्य कमी झाले नाही, उलट अधिकाधिक मतांनी ते विजयी होत गेले. यावरूनच नागरिकांचा त्यांच्यावरील निस्सीम विश्वास व प्रेम स्पष्ट होते. निंभोरा गावाचा सुपुत्र एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचा उपमहापौर होणे ही तालुका व गावासाठी अभिमानाची बाब आहे. ध्रुवकिशोर पाटील यांच्या यशामुळे भावकी व गावकीचा सन्मान अधिकच वाढला आहे.

Leave a Reply