एसटी बस थांबवून चालक-वाहकाला शिवीगाळ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) एसटी बस थांबवून चालक व वाहकाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी अमळनेर–पारोळा मार्गावर सडावण गावाजवळ घडली. या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  एसटी बस (क्रमांक एमएच–२०–२०८२) चे चालक सकाळी सुमारे ६.३० वाजता अमळनेर बसस्थानकातून ड्युटीवर होते. त्यांच्यासोबत वाहक नरहरी युवराज सोनवणे (रा. गांधली, ता. अमळनेर) हे कार्यरत होते. पारोळा–अमळनेर दरम्यान बसची फेऱ्या सुरू असताना दुपारी सुमारे १२.२० वाजता सडावण गावाजवळ ही घटना घडली. त्या वेळी पारोळाहून अमळनेरकडे बस येत असताना मोटारसायकलवरून (एमएच–१९–डीवाय–६७३६ ) तीन अज्ञात तरुण भरधाव वेगाने जात होते. अमळनेर–पारोळा रस्त्याचे काम सुरू असल्याने बस चालक बस सावकाश चालवत होता. त्यामुळे मोटारसायकलस्वारांना वेग कमी करावा लागल्याने त्यांनी बस थांबवण्यास सांगितले. बस थांबवल्यानंतर तिन्ही जणांनी चालकाला खाली उतरवून वाद घालत शिवीगाळ केली. तसेच चालक व वाहकाला धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ बस जाऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सडावण गावातील नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागल्याने तिघेही मोटारसायकलवरून पळून गेले.

या घटनेप्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *