अमळनेरमध्ये पीएम सूर्यघर योजनेत अन्याय होत असल्याचा आरोप

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या मागील १२ महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित सौर प्रकल्प क्षमतेवर निर्बंध लादल्याने पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना अंतर्गत महाराष्ट्रातील ग्राहकांवर अन्याय होत असल्याचे निवेदन अमळनेर तालुका सोलर असोसिएशनतर्फे देण्यात आले आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांना देण्यात आले.

असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरात ग्राहकांना स्वतःसाठी एक किलोवॅटपासून पुढे कितीही विद्युत भार मंजूर करून त्या क्षमतेचे सोलर प्रकल्प बसवण्याची मुभा आहे. मात्र महाराष्ट्रात वितरण कंपनीकडून मागील १२ महिन्यांची सरासरी पाहूनच विद्युत भार मंजूर केला जात असून त्यानुसार सौर प्रकल्पाला परवानगी दिली जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वीज वापर वाढल्यास ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल भरावे लागणार आहे. तसेच ग्राहकांना विद्युत भार अपडेट करण्यासही मर्यादा येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सौर प्रकल्प बसवणे हे केवळ वीज बचतीपुरते मर्यादित नसून स्वच्छ व शाश्वत जीवनशैलीकडे टाकलेले पाऊल आहे. १२ महिन्यांच्या सरासरी वापराचे बंधन हरित ऊर्जेच्या उद्दिष्टांविरोधात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सौर उर्जेमुळे नागरिक गॅसऐवजी इलेक्ट्रिक शेगडी, इंधनाऐवजी इलेक्ट्रिक वाहने तसेच इंडक्शन कुकिंग साधनांचा वापर करू लागले आहेत. मात्र क्षमतेवर मर्यादा आल्यास नागरिक पुन्हा पारंपरिक इंधनाकडे वळतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वितरण कंपनी तोटा होत असल्याचा दावा करीत असली तरी ग्राहकांकडून ९ ते १९.५० रुपये प्रति युनिट दर आकारला जातो, तर अतिरिक्त निर्यात होणाऱ्या विजेसाठी फक्त २.९० रुपये प्रति युनिट मोबदला दिला जातो, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर वीज निर्मिती होत असल्याने दूरवरच्या औष्णिक प्रकल्पांमधून वीज आणताना होणारा तोटा टळतो, असेही नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातच ग्राहकांवर अशा प्रकारे मर्यादा घालण्यात येत असल्याने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा व विद्युत भार वाढवण्यावरील सवलत बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष प्रवीण शिंपी, उपाध्यक्ष निलेश वाघ, जनरल सेक्रेटरी मनोज पाटील, खजिनदार किसन पाटील यांच्यासह सागर पाटील, महेंद्र मकडीया, उषा सोलर, सूर्या बॅटरी, सुदर्शन सोलर, शिरसाठ एंटरप्रायझेस, साई सोलर, एस के सोलर, पियुषा इंजिनियर्स, एस पी सोलर, शंभूराजे इलेक्ट्रिकल, युनिव्हर्सल सोलर, शिव छत्रपती एंटरप्रायझेस, सनहिल सोलर, एच आर सोलर, सन बिंग आदींच्या सह्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *