प्रगतिशील महाराष्ट्र प्रदर्शनाला अमळनेरमध्ये पहिल्याच दिवशी चार हजारांवर नागरिकांची भेट

खा. स्मिताताई वाघ यांच्या उपक्रमातून तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी; मंत्री संजय सावकारे यांचे स्टार्टअपचे आवाहन

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कलागुरु मंगल कार्यालयात खा. स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. उद्योग-व्यवसायाच्या नव्या संधी आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार विद्यार्थी, नागरिक व महिलांनी भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून राज्य सरकारने २३५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाचा फटका शेतीला बसत असताना उद्योग व व्यवसायाच्या नव्या कल्पना तरुणांना मिळाव्यात, या उद्देशाने खा. स्मिताताई वाघ यांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. तरुणांनी प्रदर्शनातून नवनवीन कल्पना घेऊन आपापले स्टार्टअप सुरू करावेत, असे आवाहन मंत्री संजय सावकारे यांनी उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी मंचावर खा. स्मिताताई वाघ, रावेरचे आमदार अमोल जावळे, विधान परिषद आमदार नंदुभाऊ महाजन, खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन निरज भाऊ अग्रवाल, मुनिशन्स इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सरवर, यंत्रा इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरंजन लाल, भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, भाजपा कृषी आघाडीचे श्रीनिवास मोरे, फ्रेंड्ज एक्झिबिशनचे चेअरमन आनंद पाल, अखिला श्रीनिवासन, दीपकसिंग मेहता, भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कृतिका अप्रे, भारती सोनवणे, डीसीसीच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते. कलागुरु मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या प्रदर्शनाला अमळनेर शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट दिली. विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रारंभी केलेले संचलन लक्षवेधक ठरले. पहिल्याच दिवशी जवळपास चार हजार जणांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी खा. स्मिताताई वाघ म्हणाल्या की, गेल्या वेळी जळगाव येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजना पोहोचाव्यात, या उद्देशाने अमळनेरमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अमोल जावळे व आमदार नंदुभाऊ महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रदर्शनादरम्यान यूनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने मंगरूळ येथील मयत शेतकरी बापू साहेबराव पाटील यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेतून मंजूर झालेल्या दोन लाख रुपयांचा धनादेश प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सायंकाळी चार वाजता अमळनेर शहरातील व्यापारी व एमआयडीसीतील उद्योजकांनी खा. स्मिताताई वाघ यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी उद्योजकांनी विविध अडचणी मांडत तालुक्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. खा. स्मिताताई वाघ यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांनी आभार मानले.

 

प्रदर्शनात केंद्र व राज्याच्या ७५ हून अधिक संस्थांचा सहभाग

 

या प्रदर्शनात केंद्र व राज्य पातळीवरील ७५ हून अधिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. त्यात कर्नाटक साबुन एवं डिटर्जेंट लिमिटेड, भारतीय पॅकेजिंग संस्थान, जैव प्रौद्योगिकी विभाग, वैज्ञानिक एवं औद्योगिक अनुसंधान परिषद, भारतीय मानक ब्यूरो, कृषि राज्य सहायता, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, राष्ट्रीय बीज निगम, भारतीय रेल्वे खानपान एवं पर्यटन निगम लिमिटेड, काजू एवं कोको विकास निदेशालय, महाजेनको, भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघ, त्रिपुरा चाय विकास निगम लिमिटेड, यंत्र इंडिया लिमिटेड, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण, डाक विभाग, नाडा इंडिया, केंद्रीय सिद्ध अनुसंधान परिषद, भारतीय रेशम चिन्ह संगठन, भारतीय समुद्री विश्वविद्यालय, कृषक भारती कोऑपरेटिव लिमिटेड, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई, राष्ट्रीय बागवानी बोर्ड, डिजिटल इंडिया भाषिणी प्रभाग, राष्ट्रीय अनुसूचित जनजाति वित्त एवं विकास निगम, केंद्रीय मात्स्यिकी नौचालन एवं इंजीनियरिंग प्रशिक्षण संस्थान, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान, विपणन एवं निरीक्षण निदेशालय, नेशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड, म्यूनिशन्स इंडिया लिमिटेड, नाबार्ड, विकास आयुक्त हथकरघा, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ईसीजीसी लिमिटेड, बीरबल साहनी पुराविज्ञान संस्थान, भारतीय चाय बोर्ड, लघु उद्योग विकास बैंक ऑफ इंडिया, मृदा एवं भूमि उपयोग सर्वेक्षण संस्थान, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-गवर्नेंस प्रभाग, इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांचा समावेश आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *