
डॉक्टरांच्या तत्परतेमुळे सर्पदंश झालेला १२ वर्षीय हर्षल परतला मृत्यूच्या दारातून
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील भरवस येथील १२ वर्षीय हर्षल जाधव याचा सर्पदंशातून थरारक बचाव झाल्याची घटना समोर आली आहे. वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे त्याचा जीव वाचला असून सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता हर्षल हा घरी मोबाईलवर खेळत असताना त्याला काहीतरी चावल्याचे जाणवले. त्याने तात्काळ आईला सांगितले व आईने वडिलांना कळविल्यानंतर त्यांनी लगेच त्याला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हर्षलला उजव्या हातावर सर्पदंश झाला होता. काही वेळातच त्याला डोळे झाकले जाणे (प्टोसिस), बोलण्यात अडचण, गिळताना त्रास तसेच श्वास घेण्यास अडचण अशी गंभीर लक्षणे दिसू लागली.
परिस्थिती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रकाश ताळे यांनी तात्काळ अँटी-स्नेक व्हेनम देऊन प्राथमिक उपचार केले. मात्र रुग्णाची प्रकृती खालावत गेल्याने व श्वसन स्नायूंवर परिणाम होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे हलविण्यात आले.
नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल होताच रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी तातडीने सीपीआर करून इंट्युबेशनद्वारे व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉ. संदीप जोशी, डॉ. अर्जुन पावरा, डॉ. परेश पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. पायल नेतकर यांच्या तज्ज्ञ टीमने समन्वयाने उपचार करत हर्षलचा जीव वाचवण्यात यश मिळवले. उपचारानंतर हर्षलची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे शुद्धीवर आला आहे. हर्षलच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानताना भावनिक शब्दांत सांगितले, “आमच्या मुलाला नवजीवन दिल्याबद्दल आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. आपण आमच्यासाठी देवदूत आहात.” या यशस्वी उपचारामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉ. प्रकाश ताळे तसेच नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टर टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वेळेवर उपचारच ठरले जीवनदायी
या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, सर्पदंशानंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. योग्य वेळी अँटी-स्नेक व्हेनम आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो. उशीर किंवा अंधश्रद्धेमुळे जीव धोक्यात येऊ शकतो.
जनतेसाठी संदेश
सर्पदंश झाल्यास घरगुती किंवा मांत्रिक उपाय करू नयेत. तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे.‘गोल्डन अवर’ वाचवणे म्हणजे जीव वाचवणे.

Leave a Reply