
अमळनेरमध्ये पोस्टल सेवेचा उडाला बोजवारा; नवीन पोस्ट ऑफिस सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहराची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली हद्द आणि दररोज होणारे लाखो रुपयांचे व्यवहार लक्षात घेता शहरात आणखी तीन ते चार पोस्ट ऑफिसची नितांत गरज आहे. मात्र नवीन कार्यालये सुरू करण्याऐवजी सुरू असलेली पोस्ट ऑफिस बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पैलाड भागात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करावे तसेच मुख्य डाकघरात तात्काळ अतिरिक्त काउंटर सुरू करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी औरंगाबाद विभागीय कार्यालय, जळगाव डाक अधीक्षक तसेच अमळनेर पोस्टमास्तर यांना निवेदन दिले असून, निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा आणि चाळीसगावसारख्या तालुक्यांच्या ठिकाणी चार-चार पोस्ट ऑफिस कार्यरत आहेत. मात्र अमळनेरमध्ये वाडी चौक आणि प्रताप नगर येथील पोस्ट ऑफिस अकारण बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा भार एकमेव मुख्य पोस्ट ऑफिसवर पडत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा विशेषतः ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील पैलाड भाग हा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला असून या ठिकाणी जगप्रसिद्ध श्री मंगळदेव ग्रह मंदिरासह अनेक व्यावसायिक व उद्योजक आहेत. पोस्ट विभागाने पार्सल आणि कुरिअर सेवा सुरू केल्याने येथून दररोज शेकडो पार्सल पाठवले जातात. मात्र या सर्वांना शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पैलाड, आर. के. नगर, गळवाडे रोड आणि वाडी चौक परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नवीन पोस्ट ऑफिस मंजूर होईपर्यंत मुख्य पोस्ट ऑफिसमधील कामाचा ताण कमी करण्यासाठी पार्सल व नोंदणीकृत टपाल स्वीकारण्यासाठी किमान दोन अतिरिक्त काउंटर तात्काळ सुरू करावेत, अशी आग्रही मागणी धनंजय सोनार यांनी केली आहे. टपाल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Leave a Reply