
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘ईएफ’ फॉर्मचे वितरण आणि माहिती संकलन
अमळनेर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ईएफ फॉर्म वितरण व माहिती संकलनाचे काम अमळनेर तालुक्यात वेगाने सुरू आहे. पात्र मतदारांची अचूक नोंदणी व्हावी आणि मतदार यादीतील त्रुटी दूर व्हाव्यात, या उद्देशाने अधिकारी व कर्मचारी घराघरांत जाऊन नागरिकांशी संपर्क साधत आहेत.
ही मोहीम अमळनेरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी मयूर भंगाळे व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. पर्यवेक्षक पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे) यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र पाटील (झाडी), ग्राम महसूल अधिकारी अमोल चक्रे (जवखेडे), शिक्षक छगण पावरा, शिक्षक जाहिद खा शहीद पठाण, अंगणवाडी सेविका माधुरी रामकृष्ण पाटील, अंगणवाडी सेविका नीता वसंत शेवाळे आणि ग्राम रोजगार सहाय्यक सागर विनोद पाटील हे ईएफ फॉर्म वितरण व मतदारांची माहिती संकलनाचे काम प्रभावीपणे पार पाडत आहेत. या मोहिमेदरम्यान नागरिकांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, चालू भ्रमणध्वनी क्रमांक आणि दोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे तयार ठेवावीत, तसेच ईएफ फॉर्म अचूक भरून संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत होण्यास मदत होणार असून, सर्व नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply