साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांनी हिंदी सप्ताहाची सांगता

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये हिंदी दिवसानिमित्त संपूर्ण सप्ताह विविध उपक्रम आणि स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी २१ सप्टेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

प्रास्ताविकात अनिता बोरसे यांनी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच हिंदीचा गौरव वाढविण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. वक्तृत्व स्पर्धेत कल्याणी पाटील (इयत्ता दहावी-अ) हिने प्रथम, दिव्यानी पाटील (इयत्ता दहावी-अ) हिने द्वितीय, पूजा पाटील (इयत्ता दहावी-अ) हिने तृतीय क्रमांक मिळविला, तर अक्षरा साळुंखे (इयत्ता आठवी-अ) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यशस्वी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दृष्टी चौधरी हिचाही अध्यक्ष संदीप घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दृष्टी चौधरी हिला मुकेश पाटील व आर. एम. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी सांगितले की, “तुम्ही प्रत्येक भाषा शिका व समजून घ्या, भाषा शिकल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होत असते. तुम्ही जो पूर्ण आठवडा विविध उपक्रम व स्पर्धा राबवल्या तुमचे व तुमच्या हिंदी शिक्षकांचे मनापासून कौतुक, खऱ्या अर्थाने तुम्ही हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करत आहात.” कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन हिंदी शिक्षक दिलीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले, तर आभार मुकेश पाटील यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *