
अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव उत्साहात; रक्तदान, गुणगौरव व व्याख्यानातून इतिहासाला उजाळा
अमळनेर (प्रतिनिधी) वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव यंदाही अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि ऐतिहासिक व्याख्यान अशा सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी महाराणा चौकातील स्मारकस्थळी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १०० हून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात व्याख्यान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रा. धर्मसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, नगरसेवक महेश देशमुख, जितेंद्र ठाकुर, व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे, राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, सूरज परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्राचार्य संजय गिरासे यांनी “महाराणा प्रताप : हळदीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर व्याख्यान देत इतिहासातील प्रेरणादायी घटनांना उजाळा दिला. महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी शेतकी संघ व नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
मिरवणूक आणि डीजेऐवजी रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव व व्याख्यान यांसारखे विधायक सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी राजपूत एकता मंचाचे कौतुक केले आणि समाजबांधवांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजपूत एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply