
पाडळसरे धरण रखडले, १०१० कोटींच्या सिंचन योजनांवरून अमळनेरात राजकारण तापले
राजवडपर्यंत पाइपलाइन विस्तारल्याने दुष्काळी गावांवर अन्यायाचा आरोप; लोकप्रतिनिधींवर उपस्थित केला प्रश्न 
अमळनेर (प्रतिनिधी) तब्बल तीन दशकांपासून रखडलेल्या पाडळसरे धरणाच्या मुद्द्यावरून अमळनेर तालुक्यात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. एकीकडे धरण अद्याप पूर्णत्वास गेले नसताना दुसरीकडे निम्न तापी प्रकल्पांतर्गत १०१० कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनांची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र या योजनांचा लाभ तालुक्यातील बहुतांश दुष्काळी गावांना मिळत नसल्याचा आरोप होत असून राजवडपर्यंत पाइपलाइन विस्तारल्याने माजी आमदार साहेबराव पाटील, आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांच्या भोवती सिंचनाचे राजकारण चांगलेच तापले आहे. दुष्काळी भागांना वगळून राजकीय प्रभाव असलेल्या भागांना प्राधान्य दिल्याची चर्चा आता गावागावांत रंगू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र शासनाच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या अमळनेर तालुक्याला संजीवनी ठरणारे पाडळसरे धरण तब्बल तीन दशकांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. धरणात अपेक्षित जलसाठा उपलब्ध नसतानाच निम्न तापी प्रकल्पांतर्गत तब्बल १०१० कोटी रुपये खर्चाच्या पाच शासकीय उपसा सिंचन योजनांची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र या योजनांमधून अमळनेर तालुक्यातील एकूण ६९ हजार २३२ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २० हजार १२.५४ हेक्टर क्षेत्रालाच सिंचनाचा लाभ मिळणार असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. युती शासनाच्या काळात १९९८ मध्ये तापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र निधीअभावी धरणाचे काम गेली ३० वर्षे रखडल्याची टीका सातत्याने होत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पाडळसरे धरण हा प्रमुख राजकीय मुद्दा राहिला. धरण पूर्णत्वास नेण्याच्या आश्वासनांवर अनेक निवडणुका जिंकल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात धरणाचे काम अद्याप अपूर्णच आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी मेसर्स जीए इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर (राजस्थान) या कंपनीला १०१० कोटी रुपयांचा कार्यादेश दिला आहे. बोहरा, कलाली, धुपे, खेडी बुद्रुक आणि गांधली येथे पंपिंग हाऊस उभारून गुरुत्वाकर्षण पाइप वितरण जाळे तयार करण्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. ऑक्टोबर २०२८ पर्यंत पाचही उपसा सिंचन योजना पूर्ण करून त्यानंतर पुढील पाच वर्षे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपविण्यात आली आहे.
या योजनांद्वारे एकूण २५ हजार ६५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये अमळनेर तालुक्यातील ६१ गावांतील २० हजार १२.५४ हेक्टर, पारोळा तालुक्यातील ७ गावांतील २ हजार ७०५.०३ हेक्टर, चोपडा तालुक्यातील ८ गावांतील २ हजार ५६१.०४ हेक्टर आणि धरणगाव तालुक्यातील एका गावातील ३७८.८७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
२००९ च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पारोळा तालुक्यातील ४२ गावे अमळनेर मतदारसंघात समाविष्ट झाली. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये पारोळा तालुक्यातील राजवड येथील माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांना राजकीय बळ मिळाल्यानंतर प्रस्तावित उपसा सिंचन योजनेत बदल करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. गांधली येथे पंपिंग हाऊस मंजूर करून पुढे तब्बल १६.६६० किलोमीटर गुरुत्वाकर्षण पाइप वितरण जाळे वाढवत योजना राजवडपर्यंत नेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
तसेच अमळनेर तालुक्यातील २३ गावांसाठी उपसा सिंचन योजना क्रमांक १ अंतर्गत सुमारे साडेसतरा किलोमीटर, तर पारोळा तालुक्यातील राजवडसह इतर सहा गावांसाठी योजना क्रमांक ३ व ४ अंतर्गत सुमारे साडेसत्तावीस किलोमीटर पाइपलाइन टाकण्याची कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान खासदारांचा प्रभाव मानल्या जाणाऱ्या पश्चिम भागातील जानवे–मंगरूळ जिल्हा परिषद गटातील बहुसंख्य दुष्काळी गावे या योजनांमधून वगळण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. तरीदेखील सिंचन योजनांचा लाभ न मिळाल्याने ग्रामस्थांनी शासनावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. निम्न तापी प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के लाभक्षेत्र अमळनेर तालुक्यात विस्तारित असल्यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा करून ३ एप्रिल २०१७ रोजी शासन निर्णयाद्वारे निम्न तापी प्रकल्प विभागाचे कार्यालय चोपडा येथून अमळनेर येथे स्थलांतरित केले होते. मात्र प्रत्यक्ष लाभवाटपात अमळनेरच्या दुष्काळी भागाला दुय्यम स्थान दिल्याची भावना अधिक तीव्र होत असून या संपूर्ण प्रकरणावरून तालुक्यात राजकीय आणि भौगोलिक संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपसा सिंचन योजनांचे काम प्रगतीपथावर चालू
“तालुक्यातील शासकीय उपसा सिंचन योजनांचे काम प्रगतीपथावर चालू असून आतापर्यंत योजनेचे ४२ टक्के काम पूर्ण झालेले असून निम्न तापी प्रकल्पातील भौगोलिक परिस्थिती पाहता पाणी कालवा ऐवजी उपसा सिंचन योजनांच्या साहाय्याने उचलून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. बोहरा येथील उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ च्या पंप हाऊसचे खोदकाम पूर्ण झाले आहे. तसेच कलाली येथील उपसा सिंचन योजना ३ व ४ च्या पंप हाऊसचे खोदकाम देखील पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ४तालुक्यातील सुमारे २५ हजार ६५७ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी आणण्यासाठी पाईपलाईन टाकली जात आहे. सुमारे ७४ किमी मुख्य पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यापैकी ४६ किमी पाईप टाकले गेले आहे. तर वितरण प्रणालीसाठी सुमारे ४९१ किमी पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्यापैकी २०८ किमी वितरण प्रणाली पूर्ण झाली आहे.”
– य. म. कडलग, कार्यकारी अभियंता, निम्न तापी प्रकल्प विभाग, अमळनेर

Leave a Reply