
पालिकेने मुदत संपलेला बहुउद्देशीय हॉलसह सामाजिक सभागृह सील करून घेतला ताबा
अमळनेर (प्रतिनिधी) मुदत संपल्याने नगरपरिषदेने भाडेतत्त्वावर दिलेल्या दोन स्थावर मालमत्ता जप्त करून इमारती ताब्यात घेतल्या आहेत. यात बहुउद्देशीय सभागृह (सि.स. नं. १०२२) तसेच सामाजिक सभागृह (गट क्रमांक १५३) या इमारतींचा समावेश असून, या कारवाईमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
नगरपरिषद पथकाने मंगळवारी (दि. ४ मार्च) प्रत्यक्ष स्थळी जाऊन संबंधित इमारतींवर जप्तीची नोटीस बजावून त्या सील करत नगरपरिषदेच्या ताब्यात घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली.
नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, सदर इमारती सध्या पूर्णपणे नगरपरिषदेच्या ताब्यात असून कोणत्याही व्यक्तीने परवानगीशिवाय प्रवेश करू नये किंवा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रिमायसेस (इव्हिक्शन) ॲक्ट १९५६ तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम यांतील तरतुदीनुसार करण्यात आल्याचे नगरपरिषदेने नमूद केले आहे. तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथील आयुक्त व संचालक यांच्या स्थायी निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या कारवाई दरम्यान मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कर अधिकारी अनिल बोरसे, कर निरीक्षक लौकिक समशेर, राधेश्याम अग्रवाल, विजय बागुल, मनोज सोनार यांच्यासह अतिक्रमण पथक व वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, या कारवाईमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून पुढील काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply