
महाकवी कालिदास दिनानिमित्त अमळनेरात संस्कृत विद्यार्थ्यांचा पावसाळी कवितांचा जागर
अमळनेर (प्रतिनिधी) महाकवी कालिदास दिनानिमित्त संस्कृत भारती आणि ज्ञानराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथील टाऊन हॉलमध्ये ‘आषाढस्य प्रथम दिने’ या संकल्पनेवर आधारित पावसाळी कविता व ‘मेघदूत’ निसर्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील पावसाळी कविता, गीत आणि निसर्गवर्णन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्रौपदी रघुनाथ कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी या होत्या. प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील संस्कृत शिक्षक संजय पिले उपस्थित होते. त्यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा सखोल आढावा घेत ‘मेघदूत’ या काव्यातील प्रणयभाव, निसर्गसौंदर्य आणि मंदाक्रांता वृत्तातील वैशिष्ट्यपूर्ण काव्यशैलीचे प्रभावी विवेचन केले. मेघदूतातील निसर्गवर्णन आजही साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी द्रौपदी रघुनाथ कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी संस्कृतमध्ये ‘कालिदास अष्टक’ सादर केले. त्यानंतर ‘हसरा नाचरा श्रावण आला’ हे गीत तसेच ‘रंगारी श्रावण’ ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या विद्यार्थिनींना प्रज्ञा जोशी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘कालिदास जने जने’ हे संस्कृत गीत सादर केले. ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘सरसर आयान्ति वर्षाधारा’ हे संस्कृत गीत सादर केले. त्यांना देवयानी भावसार यांनी मार्गदर्शन केले. तसेच सेंट मेरी स्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविता सादर केली. त्यांना राहणे मॅडम आणि बागुल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला संस्कृत विषयाचे नववी-दहावीचे विद्यार्थी, संस्कृतप्रेमी आणि रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. प्रमुख वक्त्यांचा परिचय सुधीर टाकणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी भावसार यांनी ओघवत्या शैलीत केले, तर भावेश्री जोशी यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी, नव्या पिढीला संस्कृत साहित्याची समृद्ध परंपरा आणि महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय व्हावा, या उद्देशाने संस्कृत भारतीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
संस्कृत साहित्य, पावसाळी काव्य आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply