कोणतीही कर वाढ नसलेला अमळनेर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प केला सादर

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेने कोणतीही कर वाढ न करता आर्थिक वर्ष २०२६–२७ चा अर्थसंकल्प सभागृहात विधिवत सादर केला.

अर्थसंकल्प नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर केला. उपाध्यक्ष  प्रशांत निकम तसेच सर्व  नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध सूचना व प्रभागनिहाय अपेक्षा विचारात घेऊन अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी शहराच्या संतुलित विकासासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे नमूद केले. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी नियोजनबद्ध खर्च व वेळेत अंमलबजावणीवर भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. उपाध्यक्ष प्रशांत निकम यांनी सर्व प्रभागांचा समान विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. करवाढीविना विकास, नियोजनबद्ध खर्च, वाढती आर्थिक क्षमता आणि शासन अनुदानाचा जास्तीत जास्त उपयोग या तत्त्वांवर आधारित हा अर्थसंकल्प अमळनेर शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर, हरित व आधुनिक बनविण्याच्या संकल्पपूर्तीसाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे

 

मालमत्ता हस्तांतरण फी २% वरून १% करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आलेला असून विशेष सर्वसाधारण सभेने देखील तो एकमताने मंजूर केला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुदृढीकरण व दीर्घकालीन उपाययोजनांवर भर. शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख रस्त्यांच्या विकासकामांना विशेष प्राधान्य. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी स्वतंत्र तरतूद. नागरी सेवा व मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आवश्यक आर्थिक नियोजन. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांसाठी निधी मागणीत वाढ; अधिकाधिक अनुदान मिळवून प्रलंबित व नव्या कामांना गती देण्याचे नियोजन. आर्थिक शिस्त, पारदर्शकता व वेळबद्ध कार्यवाहीवर विशेष भर.

 

अर्थसंकल्पीय तरतुदी अशा  

 

अर्थसंकल्पानुसार एकूण महसुली उत्पन्न अंदाजित ९३.८४ कोटी रुपये तर भांडवली उत्पन्न अंदाजित २८९.९९ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले असून एकूण जमा ३८३.८३ कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आलेला आहे. तसेच एकूण महसुली अंदाजित खर्च रु. ९३.८१ कोटी व भांडवली अंदाजित खर्च २८९.९९ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आलेला असून काटेकोर आर्थिक शिस्त व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे अंदाजे ३.१६ लाख रुपये इतकी शिल्लक राखण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *