
मेहतर कॉलनीतील घराला भीषण आग; गॅस सिलिंडर बाहेर काढत अग्निशमन दलाने टाळला अनर्थ, लाखोंचे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील गांधलीपुऱ्यातील मेहतर कॉलनीमध्ये शुक्रवारी, दि. १३ रोजी दुपारी एका घराला भीषण आग लागून घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. मात्र, जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसाने घरात प्रवेश करून गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मेहतर कॉलनीतील पप्पू वसंत कलोसे हे कुटुंबासह घराबाहेर गेले असताना दुपारी सुमारे २.२७ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना पाचारण करून अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला. मात्र, मेहतर कॉलनीतील अरुंद गल्ली आणि दुसऱ्या मजल्यावरील घर असल्याने अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले. अग्निशमन दलाचे कर्मचारी फारूख शेख, दिनेश बिऱ्हाडे, रफिक पठाण, आकाश बाविस्कर आणि लखन कंखरे यांनी प्रसंगावधान राखत पाईप लांबपर्यंत वाढवले आणि शेजारच्या घरांवर चढून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, घरामध्ये प्रचंड धूर साचला होता आणि गॅस सिलिंडर आत अडकून पडले होते. उष्णतेची तीव्रता वाढत असताना कोणत्याही क्षणी सिलिंडरचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा धोकादायक परिस्थितीतही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता, ऑक्सिजन उपकरणांशिवाय घरात प्रवेश केला आणि गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. अन्यथा सिलिंडरचा स्फोट झाल्यास आजूबाजूच्या घरांसह संपूर्ण मेहतर कॉलनी धोक्यात आली असती.
या आगीत घरातील एसी, दूरदर्शन संच, फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, पलंग तसेच अन्य सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेल्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. शहरातही त्यांच्या या धाडसी कार्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply