
प्रांताधिकाऱ्यांचा मध्यरात्री छापा; जळोद येथे दोन ट्रॅक्टर जप्त, बोरी नदीपात्रात ३० ब्रास अवैध वाळूसाठा आढळला
अमळनेर (प्रतिनिधी) वाळूचे अधिकृत ठेके बंद झाल्यानंतरही तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. जळोद येथील तापी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी शुक्रवारी (दि. १३) पहाटे १.१५ वाजता धाडसी छापा टाकून दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. तसेच बोरी नदीपात्रातही छापा टाकून सुमारे ३० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना मध्यरात्री अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक तलाठ्याला माहिती न देता कुऱ्हे खुर्द येथील ग्राममहसूल अधिकारी अमोल पाटील यांना सोबत घेत थेट जळोद येथील तापी नदीपात्रात धाड टाकली. या कारवाईदरम्यान नितीन चंद्रशेखर पाटील (रा. अमळगाव) हा एमएच-१९ डीव्ही-४६२२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे, तर पंकज रवींद्र सावळे (रा. जळोद) हा विनानंबर ट्रॅक्टरद्वारे जळोद-खवशी रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. प्रांताधिकारी भंगाळे यांनी तत्काळ तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच पळासदळे येथील ग्राममहसूल अधिकारी पी. एस. केदार यांना घटनास्थळी बोलावून दोन्ही ट्रॅक्टरचा पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
या दोन्ही वाहनांवर महसूल नियमांनुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली. दरम्यान, बोरी नदीपात्रात फापोरे आणि हिंगोणे गावांच्या परिसरातही अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार दि. १३ रोजी दुपारी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि ग्राममहसूल अधिकारी अमोल पाटील यांनी अचानक छापा टाकला. मात्र कारवाईची माहिती आधीच मिळाल्याने नदीपात्रात उत्खनन करणारे संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाले. तथापि, तपासणीदरम्यान नदीपात्रात सुमारे ३० ब्रास वाळूचा साठा आढळून आला. यानंतर अमळनेर शहराचे मंडळाधिकारी धनराळे यांना वाळूसाठ्याचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सदर वाळूसाठ्याची ताबा पावती संबंधित पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या स्वाधीन करण्यात आली असून लिलावाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साठ्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशाच प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार
“अमळनेर तालुक्यात कोठेही अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे समजले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”
– मयूर भंगाळे, उपविभागीय अधिकारी, अमळनेर

Leave a Reply