वडिलांच्या आठवणींनी प्रताप हायस्कूलमध्ये रमले चैनसुखजी संचेती

अमळनेर (प्रतिनिधी) वडिलांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच प्रताप हायस्कूलमध्ये भेट देत माजी आमदार तथा नीतीमूल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष चैनसुखजी संचेती यांनी वडील स्व. मदनलालजी नथमलजी संचेती यांच्या शैक्षणिक आठवणींना उजाळा दिला. साने गुरुजींच्या सानिध्यात वडिलांनी घेतलेल्या शिक्षणाच्या आठवणी जागवतानाच त्यांनी शाळेतील जुन्या प्रवेश नोंदींची पाहणी करून संबंधित कागदपत्रांची प्रत घेतली.

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर चैनसुखजी संचेती यांनी प्रताप हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी वडिलांच्या शैक्षणिक जीवनातील आठवणी उपस्थितांशी कथन केल्या. त्या काळातील शैक्षणिक संस्कार आणि पूजनीय साने गुरुजी यांच्या सानिध्यात वडिलांनी घेतलेल्या शिक्षणाविषयी त्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाळेतील प्रवेशापासून ते नागपूर येथे विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या वडिलांनी दिलेल्या बंगल्यापर्यंतच्या आठवणींचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विवाहाची जबाबदारी सोपविल्याची आठवण, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासोबत त्यांच्या वडिलांनी घालविलेला कार्यकाळ आणि भगवद्गीता व तिच्या अर्थाविषयीही त्यांनी माहिती दिली. यानंतर चैनसुखजी संचेती यांनी वडिलांच्या शाळा प्रवेशासंदर्भातील कागदपत्रे मिळविण्यासाठी स्वतः अर्ज केला. शाळेच्या जुन्या रजिस्टरमध्ये वडिलांच्या प्रवेशावेळी करण्यात आलेल्या नोंदींची त्यांनी पाहणी केली. शाळेने जतन करून ठेवलेल्या जुन्या रजिस्टर आणि कागदपत्रांचे त्यांनी कौतुक केले. त्यानंतर प्रताप हायस्कूल परिसरातील साने गुरुजी स्मारकाला भेट देत त्यांनी सुमारे एक तास वेळ घालविला. यावेळी साने गुरुजींच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत शाळेतील विविध ठिकाणी छायाचित्रेही काढली. वडिलांच्या शिक्षणाच्या आठवणी आणि जुन्या शालेय नोंदी प्रत्यक्ष पाहण्याचा हा अनुभव त्यांच्यासाठी भावनिक ठरला. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन सी. ए. नीरज अग्रवाल, व्हाईस चेअरमन जितेंद्र जैन, संचालक प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, रीता बाविस्कर, सहचिटणीस विजय मांटे, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, करुणा शिक्षक डी. एन. पालवे, एस. एस. खांजोडकर आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *