एचआयव्हीग्रस्त महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी आधार संस्थेला स्नेहालयचा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार प्रदान

अमळनेर (प्रतिनिधी) एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व बालकांचे उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अमळनेरच्या आधार बहुउद्देशीय संस्थेला स्नेहालय संस्था, अहिल्यानगर यांच्यातर्फे ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने संस्थेच्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा गौरव झाला असून, अमळनेरसह जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

तीन दशकांपूर्वी एचआयव्ही आणि एड्सबाबत समाजात मोठी भीती व गैरसमज होते. कोणताही दोष नसताना एचआयव्हीची लागण झालेल्या महिला व बालकांना सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागत होते. उपचार, सहानुभूती आणि सामाजिक संधींपासूनही त्यांना वंचित ठेवले जात होते. अशा परिस्थितीत स्नेहालय संस्थेने १९९२ मध्ये उपचार व निवासी पुनर्वसनाची पायवाट भारतात प्रथम निर्माण केली. त्यानंतर १९९९ पासून जळगाव जिल्ह्यात डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजय वाघमारे यांनी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे कार्य पुढे नेण्यास सुरुवात केली.

लैंगिक कामगार महिलांमध्ये एचआयव्हीविषयी जनजागृती करणे, एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांना उपचार आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आईकडून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक मार्गदर्शन व उपचार मिळवून देण्याचे काम आधार संस्थेने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने केले आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यांतील एचआयव्हीसह जगणाऱ्या १६ हजार व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांसोबत संस्था कार्यरत आहे.

लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या आणि वंचित महिलांना आधार कार्ड, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका, मिशन वात्सल्य, बाल संगोपन योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आरोग्य सुविधा आणि विमा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, बालविवाह आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवरही संस्थेने काम केले आहे. बचत गटांसह विविध माध्यमांतून महिलांना संघटित करणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत स्नेहालय संस्थेने तिचा गौरव केला. वंचित महिला व बालकांना केवळ मदत न करता त्यांना आरोग्य, शिक्षण, सामाजिक सन्मान, हक्क आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे कार्य जळगाव जिल्ह्यासह देशासाठी पथदर्शी ठरत आहे. बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी औद्योगिक वसाहतीतील स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत प्रमुख संवादक म्हणून उपस्थित होते. नागेबाबा परिवाराचे कडुभाऊ काळे आणि स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. भारती पाटील, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये, सन्मानपत्र आणि पुस्तकांचा संच असे होते. स्नेहालय संस्थेने आधारच्या कार्याचा गौरव करताना, “जळगाव जिल्ह्यातील आपले कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी बनले आहे. पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्काराने आपल्याला गौरविताना धन्यता वाटते,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद आणि सचिव प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच सामाजिक कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल असून, भविष्यात वंचित महिला, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आणि बालकांच्या हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. स्नेहालय संस्थेतर्फे तळागाळातील विविध सेवाकार्यांशी देणगीदार, कार्यकर्ते आणि तरुणाईला जोडण्यासाठी १९९५ पासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. ‘बा’, ‘बापू’ आणि ‘विनोबा’ पुरस्कारांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात पायाभूत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो. आधार बहुउद्देशीय संस्थेला मिळालेला ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार’ हा तिच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा गौरव असून, वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देणारा ठरला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *