
एसआयआर मोहिमेला गती; बीएलओंच्या दारी अधिकारी, शाळांच्या वेळेत बदल व प्रशिक्षणे रद्द
अमळनेर (प्रतिनिधी) मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम शासनाने गांभीर्याने हाती घेतला असून २९ जुलैपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे बीएलओंवरील वाढता ताण कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या कामामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून शिक्षकांची विविध प्रशिक्षणेही पुढे ढकलण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मतदारांची नावे वगळणे, अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे तसेच २००२ च्या मतदार यादीची पडताळणी करण्यासाठी एसआयआर मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी बीएलओंवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षक बीएलओंना मदत करण्यासाठी सहाय्यक बीएलओंची नियुक्ती करण्यात आली. मात्र मोठ्या संख्येने शिक्षक या कामात गुंतल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ लागला. वरिष्ठ स्तरावरून सातत्याने कामाचे मूल्यमापन होत असल्याने प्रगतीचा वेग वाढविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी घरोघरी जाऊन बीएलओंच्या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनीही कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अमळनेर शहरातील बीएलओंच्या कामाची टक्केवारी तपासून संथ गतीने काम करणाऱ्या बीएलओंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामात कुचराई झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, याचीही जाणीव करून दिली.
प्रशिक्षणे पुढे ढकलली, नव्या तारखा नंतर जाहीर होणार
अनेक शाळांमध्ये बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षकांची संख्या जास्त असल्याने शाळेतील तासिका आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला होता. त्यातच इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने काही शिक्षक प्रशिक्षणासाठी, तर काही बीएलओच्या कामात व्यस्त असल्याने अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडत होत्या. त्यामुळे मुख्याध्यापक आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शाळा सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत भरविण्यात येणार आहेत. तसेच इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या तालुका व जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून त्याच्या नव्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

Leave a Reply