
अमळनेर तालुक्यात १२ वीचा इंग्रजी पेपर झाला सीसीटीव्हीच्या कडक निगराणीत
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ५ परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर मंगळवार, दि. १० रोजी शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. शासनाने लागू केलेल्या नवीन नियमावलीनुसार सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने संपूर्ण परीक्षेवर कडक देखरेख ठेवण्यात आली होती.
यावर्षी इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण ३५५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३५१९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर पहिल्याच पेपरला ३५ विद्यार्थी गैरहजर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. परीक्षा सकाळी ठरलेल्या वेळेत सुरू झाली असून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वाटपात कोणताही गोंधळ झाला नाही. तालुक्यातील प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाज केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसला असून विद्यार्थ्यांनीही नियमांचे काटेकोर पालन केले. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडल्याचे चित्र दिसून आले. काही परीक्षा केंद्रांच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या हितचिंतकांनी गर्दी केल्याचे आढळून आले. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी वेळोवेळी सूचना देत गर्दी हटवली आणि शांतता राखली. दरम्यान, इंग्रजीचा पेपर मध्यम स्वरूपाचा असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित असल्याने तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेल्याचे सांगण्यात आले. पहिलाच पेपर यशस्वीरीत्या पार पडल्याने विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण विभागाने समाधान व्यक्त केले आहे. आगामी विषयांचे पेपरही याच प्रकारे शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडावेत यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply