
एमएसईबीत नोकरी लावण्याच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक; दोन पोलीस पाटलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) एमएसईबीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील बोरगाव व लोणपंचम येथील पोलीस पाटलांसह अहमदनगर येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणपंचम येथील रामराव हरचंद पाटील यांचा पुतण्या व लोणपंचम येथील पोलीस पाटील उमेश बबनराव पाटील याने त्यांची अहमदनगर तालुक्यातील आळा फाटा येथील राजेंद्र नामदेव पोतेकर व बोरगाव येथील पोलीस पाटील गोविंदा शालीकराव शिंदे यांच्याशी ओळख असल्याचे सांगितले. संबंधितांची बँकेतील व मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असून त्यांनी अनेकांना नोकरीला लावल्याचे सांगून रामराव पाटील यांच्या सुन करिश्मा किरण पाटील व तिच्या भावाला एमएसईबीमध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी १७ लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले. ११ जून २०१५ रोजी सुनेच्या आईने शेत विकून १० लाख रुपये जमा केले व ते दोन्ही पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर उर्वरित ७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासाठी रामराव पाटील यांनी पत्नीचे दागिने विकून तसेच नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन ७ लाख रुपये दिले. मात्र बराच कालावधी उलटूनही नोकरीची ऑर्डर मिळाली नाही. २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सुनेच्या नावाची ऑर्डर आणून दिली; परंतु मुंबई येथे रुजू होण्यासाठी गेल्यानंतर यादीत तिचे नाव नसल्याचे आढळून आले. त्याबाबत विचारणा केली असता पुढील यादीत नाव येईल असे सांगण्यात आले; मात्र अनेक महिने उलटूनही नाव आले नाही. दरम्यान, पैसे परत मागितल्यानंतर पोतेकर यांच्या सहीचा ४ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला; परंतु तो धनादेश वटला नाही. त्यानंतर तक्रार होऊ नये म्हणून दोन्ही पोलीस पाटलांनी २ लाख रुपये रोख दिले. मात्र २०२५ पर्यंत वारंवार मागणी करूनही उर्वरित रक्कम परत केली नाही व नोकरीही मिळाली नाही. याबाबत मारवड पोलिसांत तक्रार दिली होती; मात्र हा दिवाणी वाद असल्याचे सांगून न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर रामराव पाटील यांनी अॅड. टी. सी. पाटील यांच्यामार्फत अमळनेर न्यायालयात धाव घेतली. साक्षीदार तपासून व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश निलेश यलमाने यांनी तक्रार ग्राह्य धरत राजेंद्र पोतेकर, गोविंदा शिंदे व उमेश पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५), ३१८, ३३६ व १७५(३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply