
जळगाव येथे रवींद्र मोरे यांना ‘ज्ञानवंत पत्रकार’ पुरस्कार प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) महादर्पणचे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार’ हा मानाचा पुरस्कार दि. १५ रोजी जळगाव येथे मोठ्या थाटात प्रदान करण्यात आला. ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६’ या कार्यक्रमात हा सन्मान देण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोरे यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालवत पत्रकारितेचे सामाजिक भान जपणाऱ्या मोरे यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत आयोजक जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी डायट प्राचार्य निलकंठ आप्पा गायकवाड यांनी मोरे यांच्या सत्यनिष्ठ व जनहितैषी पत्रकारितेचे विशेष कौतुक करत, “माध्यम हे समाजाचे आरसे असते, आणि रवींद्र मोरे यांनी त्या आरशाला प्रामाणिकपणाची धार दिली आहे,” असे गौरवोद्गार काढले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जळगावचे आमदार सुरेश भोळे, नवनिर्वाचित महापौर दिपमाला काळे तसेच माजी महापौर जयश्री महाजन उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी आयोजक संस्थेचे अध्यक्ष पंकज नाले व मुक्ताई संस्थेच्या अध्यक्षा निताताई मंगलसिंग सोनवणे यांनी मोरे यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करत सांगितले, “हा सन्मान फक्त एका पत्रकाराचा नाही, तर सत्यनिष्ठ पत्रकारितेच्या मूल्यांचा विजय आहे. ”रवींद्र मोरे यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत, “हा पुरस्कार माझ्या सहकाऱ्यांचा आणि वाचकांचा आहे. समाजातील समस्यांवर लेखणी चालवण्याचे कार्य पुढेही अविरत सुरू राहील,” असे सांगितले. या राज्यस्तरीय गौरवामुळे अमळनेरसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पत्रकार बांधवांनीही मोरे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply