
श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी (अमळनेर) येथील संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट अमृत’ या सर्वव्यापी उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यात अमळनेर शाखेच्या वतीने श्री मंगळ ग्रह देवस्थान व परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छ जल, स्वच्छ मन या संकल्पनेतून प्रेरित या अभियानात सुमारे दीडशे ते दोनशे स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यात मोलाचे योगदान दिले. सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षणास चालना देणे आणि समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता. सकाळी आठ ते अकरा या वेळेत स्वयंसेवकांनी मंगळ ग्रह परिसरातील प्लास्टिक कचरा, साचलेली घाण व इतर टाकाऊ वस्तू गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. या अभियानात अमळनेर शाखेचे प्रमुख आ. श्रीचंद निरंकारी, सेवादल इंचार्ज जितेंद्र डिंगराई तसेच निरंकारी सेवादलाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वच्छता ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आध्यात्मिक शिस्तीचा एक भाग आहे, असा संदेश या वेळी देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळत असून समाजात स्वच्छतेची सवय रुजण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत देशभरात जलस्त्रोत, सार्वजनिक स्थळे व परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला असून अमळनेर शाखेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून सेवकांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था केली. तसेच संत निरंकारी मिशनच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त करत मंगळ ग्रह संस्थानतर्फे आभार मानण्यात आले.

Leave a Reply