
अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची उसळलेली गर्दी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिर मंगळवार, दि. ५ मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. यंदाच्या २०२६ वर्षातील द्वितीय अंगारक योग असलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत हजारो भाविकांनी दर्शन, पूजा व अभिषेकासाठी मोठी उपस्थिती लावली.
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मात्र, ही चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हटले जाते. मंगळवार, दि. ५ मे रोजी आलेली ही द्वितीय अंगारक संकष्टी चतुर्थी (वैशाख वद्य चतुर्थी) दुर्मिळ आणि शुभ योगाने युक्त असल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक भाविक सोमवार, दि. ४ मे रोजीच रात्री उशिरापर्यंत मंदिरात दाखल झाले होते.
पहाटे ५.२५ वाजेपासून चतुर्थीचा प्रारंभ होणार असल्याने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे सुमारे पाच वाजता श्री गणपती बाप्पा, पंचमुखी हनुमानजी व श्री मंगळग्रह देवतेचे यजमानांच्या हस्ते विधिवत विशेष पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी भगवान श्री गुरुदत्त, श्री अनघालक्ष्मी माता, श्री कालभैरवनाथ, माता भैरवी, श्री स्वामी समर्थ महाराज आणि मंगळेश्वर महादेवांचेही दर्शन घेतले.
ही चतुर्थी बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी सकाळी ७.५१ वाजेपर्यंत असल्याने ती अहोरात्र मानली गेली. शिवयोग आणि बुधादित्य योग एकत्र आल्यामुळे हा दिवस अधिक फलदायी मानला गेला. या दिवशी उपवास केल्यास वर्षभरातील सर्व २१ संकष्टी चतुर्थींचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. रात्री सुमारे १०.३५ वाजता चंद्रोदय झाल्यानंतर अनेक भाविकांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला.
अंगारकी चतुर्थीचे महत्त्व
स्कंद पुराणानुसार अंगारक यांनी गणपती बाप्पांची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला ‘अंगारकी’ असे नाव दिले. या दिवशी उपवास केल्यास कर्जमुक्ती, आत्मविश्वासवाढ आणि अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. उपवासादरम्यान २१ दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करून, रात्री चंद्रदर्शनानंतर पूजा करून उपवास सोडण्याची प्रथा आहे.
यंदा तीन अंगारक चतुर्थी
यंदा योगायोगाने तीन अंगारक चतुर्थी आल्या आहेत. पहिली ६ जानेवारी रोजी पार पडली, दुसरी ५ मे रोजी झाली, तर तिसरी २९ सप्टेंबर २०२६ रोजी येणार आहे. पंचांगानुसार ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती आणि मंगळवार व चतुर्थी तिथीचा योगायोग यामुळे यंदा हा दुर्मिळ संयोग साधला आहे.

Leave a Reply