ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारप्रकरणी चौबारी–सबगव्हाणचे ग्रामविकास अधिकारी नितीन मराठे निलंबित

अमळनेर (प्रतिनिधी)  ग्रामपंचायतीच्या कामकाजातील अनियमितता, कर वसुलीत झालेली हलगर्जी, कार्यभार हस्तांतरणास टाळाटाळ तसेच वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी अमळनेर तालुक्यातील चौबारी व सबगव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देवदास मराठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नंदाकुमारन नायर यांनी हा आदेश जारी केला असून, तो दि. ८ ऑगस्टपासून लागू करण्यात आला आहे.

गट विकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांनी दि. ३० एप्रिल रोजी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अहवालानुसार, चौबारी व सबगव्हाण ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता करण्यात आली, ग्रामपंचायतीची केवळ ७० टक्के कर वसुली करण्यात आली, कार्यभाराचे नियमानुसार हस्तांतरण करण्यात आले नाही तसेच वरिष्ठ अधिकारी व शासनाच्या परिपत्रकांचे पालन करण्यात आले नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे मानून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम, १९६६ मधील नियम ३ (९) अन्वये नितीन देवदास मराठे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय गट विकास अधिकारी, पंचायत समिती बोदवड येथे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या निलंबन आदेशाची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ सेवापुस्तकात घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हा आदेश जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नंदाकुमारन नायर यांनी डिजिटल स्वाक्षरीने जारी केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *