
माजी आयकर सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’
अमळनेर ( प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे आणि ‘शिंगाड्यावाला शेतकरी नेता’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ‘सामाजिक पुरस्कार’ माजी आयकर सहआयुक्त (ई.डी.) उज्ज्वलकुमार चव्हाण यांना, तर ‘राजकीय (पुरोगामी) पुरस्कार’ मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांना जाहीर झाला आहे.
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २१ आणि २२ ऑगस्ट रोजी आयोजित ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहा’त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणाऱ्या या दोन दिवसीय सोहळ्यात विविध वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पारलिंगी समाज अभ्यासक व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप लाल टोपी, बागायतदार रुमाल, २१ हजार रुपये रोख आणि ‘शिंगाडेधारी गुलाबराव पाटील’ स्मृतीचिन्ह असे आहे. समारोहाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून जळगावचे प्रा. राजेंद्र देशमुख, धरणगावचे कविवर्य बी. एन. चौधरी आणि अमळनेरचे प्रा. रमेश माने काम पाहणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ९ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ७ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी २ हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार असून, विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक आणि पुरोगामी विचारांच्या परंपरेला उजाळा देणाऱ्या या वैचारिक सोहळ्यास नागरिक, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आज राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली’, ‘मानवी बुद्धीला आव्हान : समजदारीचे की कृत्रिम बुद्धिमत्तेचे?’, ‘शिक्षण आहे, पण मती, नीती आणि गती कुठे आहे?’, ‘पुन्हा खेड्याकडे चालावे का?’, ‘लोकशाहीचा वेध : प्रश्न विचारण्याची शक्ती की शांततेची सक्ती?’ आणि ‘बदलता समाज आणि बदलते कायदे’ हे स्पर्धेचे विषय आहेत.

Leave a Reply