
अमळनेर पालिकेत आज सफाई कामगारांच्या प्रश्नांवर राज्य आयोगाची आढावा बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना आता राज्यस्तरीय व्यासपीठावर वाचा फुटणार असून, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत आज २१ ऑगस्ट रोजी अमळनेर नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक होणार आहे. लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी, वारसा हक्काच्या नोकऱ्या, प्रलंबित वेतन आणि सफाई कामगारांना आवश्यक सुविधा यांसह विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
मुकेश सोनू सारवान हे आज अमळनेर शहराच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी ११ वाजता अमळनेर नगरपरिषद कार्यालयात ही आढावा बैठक होणार आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबतची सद्यस्थिती आणि प्रलंबित मागण्यांचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी, वारसा हक्काच्या नोकऱ्या, प्रलंबित वेतन, सफाई कामगारांना सुरक्षा साधनांचे वाटप, हक्काची घरे तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीस अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, संबंधित प्रशासकीय अधिकारी तसेच स्थानिक सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अमळनेर शहरातील सर्व सफाई कामगार संघटनांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रलंबित प्रश्नांवर आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान प्रशासनाकडून माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणार असल्याने बैठकीकडे सफाई कामगारांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply