
अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; ग्रामपंचायत गांधलीला राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” पुरस्कार
अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत गांधलीने राज्यस्तरावर आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत शासनाच्या महा आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023-24 मध्ये “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” या गटात तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. या यशामुळे संपूर्ण अमळनेर तालुक्याचा गौरव वाढला असून गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री शंभूराजे देसाई , उदयन राजे भोसले तसेच शिवेंद्र राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, ग्रामपंचायत गांधलीचे सरपंच भैय्यासाहेब नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद पाटील, गुणवंत सोनवणे आणि नितीन पाटील उपस्थित होते.
ग्रामपंचायत गांधलीने घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य केले. यासाठी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी, घरकुल कक्षातील अभियंते, ऑपरेटर तसेच ग्रामस्थांनी घेतलेल्या मेहनतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर मॅडम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी साहेब तसेच प्रकल्प संचालक लोखंडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांनी ग्रामपंचायत गांधलीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामपंचायत गांधलीच्या या राज्यस्तरीय यशामुळे अमळनेर तालुक्याच्या विकासकामांना नवी ओळख मिळाली असून गावाच्या प्रगतीचा हा अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.

Leave a Reply