पैलाड येथे यात्रेत दोन गटात तुफान हाणामारी ; चाकू, रॉड हल्ल्यात तिघे जखमी, ११ जणांवर गुन्हे

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पैलाड येथे संत सखाराम महाराज यात्रेदरम्यान दोन गटांतील जुन्या वादातून तुफान हाणामारी झाल्याची घटना ११ मे रोजी रात्री बोरी नदी पात्रात घडली. चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी झालेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले असून दोन्ही गटातील एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन-तीन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर जयदेव पाटील, योगेश गोविंदा धनगर आणि निखिल पाटील (सर्व रा. पैलाड) यांच्यात खुन्नस देण्यावरून वाद झाला होता. काही ग्रामस्थांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता. मात्र यात्रेत पुन्हा हा वाद उफाळून आला.

योगेश गोविंदा धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यात्रेत ड्रॅगन पाळण्याजवळून जात असताना निखिल, मयूर आणि गणेश यांनी शिवीगाळ करत हल्ला केला. निखिलने ज्ञानेश्वरच्या पोटावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असता योगेशने तो हातावर झेलला. त्यानंतर गणेश व खुशाल यांनी मारहाण केली, तर मयूरने ज्ञानेश्वरला पकडून ठेवले. यावेळी निखिलने ज्ञानेश्वरच्या गालावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. होमगार्ड घटनास्थळी आल्यानंतर आरोपी पळून गेले.

या प्रकरणी निखिल सुरेश पाटील, मयूर सुरेश पाटील, गणेश रमेश पाटील आणि खुशाल रामदास पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, निखिल पाटील यांनीही परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, यात्रेत फिरत असताना योगेश गोविंद कंखरे, ज्ञानेश्वर जयदेव पाटील, अक्षय विजय पाटील, दीपक बापूजी कंखरे, कुंदन पाटील, मुकेश धनगर आणि गोलू धनगर हे लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेऊन आले होते. योगेशकडे चाकू होता. वादातून शिवीगाळ करत योगेशने चाकूने छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला, तो हातावर झेलल्याने दुखापत झाली. तसेच ज्ञानेश्वरने लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला असता तो हाताने अडवल्याने बोट फ्रॅक्चर होऊन अंगठ्याजवळील नस कापल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचताच संबंधितांनी जीवे मारण्याच्या धमक्या देत पळ काढल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *