पिंगळवाडे येथे बिबट्याचा हल्ला; म्हशीचे पारडू फस्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंगळवाडे येथे बिबट्याने म्हशीचे पारडू फस्त केल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) पहाटे उघडकीस आली. घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे पुसट ठसे आढळून आल्याने हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले असून परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंगळवाडे येथील शेतकरी विलास पाटील यांचे गावालगत शेतात खळे असून तेथेच त्यांची जनावरे बांधलेली असतात. शुक्रवारी सकाळी जनावरांची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना सुमारे एक ते दीड वर्षे वयाचे म्हशीचे पारडू अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एक रानडुक्कर खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले होते.

घटनेची माहिती शीतल देशमुख यांनी वनपाल गुलाब पिंजारी यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनपाल गुलाब पिंजारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाठोळे तसेच पोलीस पाटील गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत जनावराचे शवविच्छेदन करून तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचनाम्यादरम्यान घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचा पुसटसा ठसा आढळून आल्याने पारड्यावर बिबट्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. नदी व जंगलालगतचा परिसर असल्यामुळे बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात असून वन विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

फटाक्यांचे आवाज करावेत, पत्र्याचे डबे वाजवावेत

 

“पिंगळवाडे परिसर नदी जंगलाचा असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाताना गटागटाने जावे, आपली जनावरे गावात बंदिस्त जागी बांधावेत. आणि बिबट्याला पळवण्यासाठी फटाक्यांचे आवाज करावेत, पत्र्याचे डबे वाजवावेत.”

– गुलाब पिंजारी, वनपाल, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *