
राष्ट्रीय संत गाडगे बाबा उद्यानाची दुरवस्था; देखभालीअभावी नागरिकांमध्ये नाराजी
अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय संत गाडगे बाबा उद्यानाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून सध्या हे उद्यान दुर्लक्षाचे बळी ठरत आहे. एकेकाळी मुलं व कुटुंबीयांच्या गजबजाटाने फुलणारे हे उद्यान आज ओस पडलेले दिसत आहे.
या उद्यानातील झोके, घसरगुंडी व इतर खेळणी तुटलेल्या अवस्थेत असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, उद्यान मागील काही दिवसांपासून बंद असले तरी परिसरातील लहान मुले दररोज संध्याकाळी येथे खेळण्यासाठी येतात. बाजूच्या मार्गाने प्रवेश करत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, तुटलेली खेळणी व अस्वच्छता यामुळे मुलांना दुखापत होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र पर्याय नसल्याने मुलांना याच ठिकाणी खेळावे लागत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानानंतर हे दुसरे मोठे उद्यान मानले जाते. मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे त्याची ओळख हळूहळू पुसट होत चालली आहे. मागील वर्षी येथील उद्यान कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती न झाल्याने नियमित साफसफाई व देखभाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. याशिवाय उद्यानात पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने सायंकाळच्या वेळी असामाजिक घटकांच्या वावराची शक्यता वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक, पालक व सामाजिक संघटनांनी नगरपालिकेकडे उद्यानाची तातडीने दुरुस्ती करणे, तुटलेली खेळणी बदलणे, स्वच्छतेची नियमित व्यवस्था करणे तसेच कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास हे उद्यान पूर्णपणे उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत असून शहरातील मुलांच्या खेळाच्या हक्कावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply