जवखेडा येथे ठिबक नळ्यांवरून दोन गटांत हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पहिल्या फिर्यादीनुसार, ५५ वर्षीय महिला व त्यांचे पती शेतात ठिबकच्या नळ्या टाकत असताना शेजारील शेतमालक संदीप आधार पाटील, देवचंद आधार पाटील, रजुबाई आधार पाटील आणि मोनाली संदीप पाटील तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करून ठिबकच्या नळ्या फेकून दिल्या. याबाबत जाब विचारल्यानंतर संदीप आधार पाटील यांनी लोखंडी सळईने महिलेच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण केल्याचा तसेच तिची साडी फाडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या गोंधळात फिर्यादी महिलेची सोन्याची पोत गहाळ झाली असून इतर आरोपींनी तिच्या पतीलाही मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

दुसऱ्या फिर्यादीनुसार, रजुबाई आधार पाटील या त्यांचे पती व सून यांच्यासह शेतातून घरी जात असताना शेजारील शेतकरी सुभाष नत्थु पाटील, प्रतिभा सुभाष पाटील, गुलाब मधुकर पाटील, वंदना गुलाब पाटील आणि मोहित गुलाब पाटील हे रस्त्यावर ठिबकच्या नळ्या टाकत होते. त्याबाबत जाब विचारल्याचा राग आल्याने त्यांनी रजुबाई यांच्या पतीला काठी व पावडीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भांडण सोडविण्यास गेलेल्या रजुबाई आधार पाटील व त्यांच्या सुनेलाही ढकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गोंधळात त्यांच्या सुनेची सोन्याची पोत गहाळ झाल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या प्रकरणीही अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *