
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदात बदलाचे संकेत; ४ जुलैच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
अशोक आधार पाटील म्हणाले, “आमदार अनिल पाटील सांगतील तेव्हा राजीनामा देईन”

अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांना पदावर तीन वर्षे पूर्ण झाल्याने आता सभापती बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने आमदार अनिल पाटील यांच्याकडून हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे ४ जुलै रोजी होणाऱ्या बाजार समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १६ मे २०२३ रोजी अशोक आधार पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली होती. सुरुवातीला त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा अपेक्षित होता. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींमुळे त्यांना सलग तीन वर्षे सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली. दरम्यान, शेतकी संघात लोण येथील संभाजी लोटन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने एकाच भागाकडे दोन महत्त्वाची पदे राहू नयेत आणि इतरांनाही संधी मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांचा विचार करून आमदार अनिल पाटील नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेत असून, ४ जुलैच्या बैठकीत सभापती अशोक आधार पाटील यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तीन वर्षांच्या कार्यकाळात अशोक आधार पाटील यांनी बाजार समितीत अनेक विकासकामे केल्याचा दावा केला जात आहे. चार कोटी रुपयांचे कर्ज असलेली बाजार समिती कर्जमुक्त करून सध्या चार कोटी रुपयांच्या नफ्यात आणल्याचे सांगितले जाते. तसेच १०० गाळे बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय, २५ नवीन गाळ्यांच्या उभारणीतून सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न, बाजार समिती व खेडा खरेदी केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, मारवड उपबाजारासाठी कंपाऊंड व उपबाजार सुरू करण्याचा प्रस्ताव, शेतकरी सन्मान उपक्रम, हजारो शेतकऱ्यांसाठी मोफत बैलपोळा, हमाल-मापाडी विमा योजना, मापाड्यांसाठी लॉकर, गुमास्ता कट्टा, सौर ऊर्जा प्रकल्प, शेतकरी सुविधा केंद्र, शासकीय लेखापरीक्षण कार्यालय, शेतकऱ्यांसाठी एटीएम सुविधा, स्वखर्चातून आरओ पाणी व्यवस्था तसेच एक कोटी रुपयांचे काँक्रीटीकरण अशी विविध कामे करण्यात आल्याने बाजार समितीने जिल्ह्यात अग्रक्रम मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे.
याशिवाय, महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी वेशातील पहिला पुतळा अमळनेर बाजार समितीत उभारण्यात आला आहे. पणनमंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने शेतकरी भवन तसेच शेतकऱ्यांसाठी अवघ्या पाच रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना सुरू करण्यासही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दीड महिन्याच्या आत मी पद सोडण्यास तयार
सभापती बदलाच्या चर्चेबाबत अशोक आधार पाटील यांनी सांगितले की, “आमदार अनिल पाटील यांच्यामुळेच मला एक नव्हे तर तीन वर्षे सभापतीपदाची संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मीही पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते सांगतील त्यादिवशी मी राजीनामा देण्यास तयार आहे. मात्र माझ्या कार्यकाळात मंजूर झालेल्या शेतकरी भवन आणि भोजन योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर दीड महिन्याच्या आत मी पद सोडण्यास तयार आहे.”
असे आहे पक्षीय बलाबल
सध्या बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, भारतीय जनता पक्षाचे पाच, काँग्रेसचे दोन आणि व्यापारी गटाचे दोन असे सदस्य आहेत. मागील वेळी कार्यकाळाच्या मुद्यावरून सचिन पाटील यांची सभापतीपदाची संधी हुकली होती. त्यामुळे यावेळी बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळासह शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply