निपुण भारत अभियानात ढिलाई खपवून घेतली जाणार नाही; प्रगती न दाखविणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाईचा इशारा

अमळनेरमध्ये तालुकास्तरीय आढावा बैठक; दोन महिन्यांत लक्षणीय सुधारणा घडविण्याचे निर्देश

 

अमळनेर (प्रतिनिधी) निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने काम करावे, अन्यथा प्रगती न दाखविणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी दिला. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मंगळवारी आयोजित तालुकास्तरीय निपुण भारत अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते.

अमळनेर तालुक्यातील पर्यवेक्षक यंत्रणा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक तसेच मराठी व उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी निपुण अभियानाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील १३३ शाळांपैकी २१ शाळा निपुण ठरल्या आहेत. डिसेंबर २०२५ मधील निपुण चाचणीत विद्यार्थ्यांचे प्रमाण २३.४७ टक्के होते. मार्च २०२६ च्या चाचणीत त्यात वाढ होऊन हे प्रमाण ३७.२४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळानिहाय निकालात १ ते १० टक्के निकाल असलेल्या ८, १० ते २० टक्के निकाल असलेल्या १४, २१ ते ५० टक्के निकाल असलेल्या ३५, ५० ते ८० टक्के निकाल असलेल्या २५, तर ८० ते ९९ टक्के निकाल असलेल्या दोन शाळांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीत शून्य टक्के निकाल असलेल्या तसेच निपुण ॲपवर माहिती न भरणाऱ्या शाळांची विशेष दखल घेण्यात आली. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यांत किमान २५ टक्क्यांहून अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतरही अपेक्षित सुधारणा न झाल्यास संबंधित शिक्षकांवर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे निलेश पाटील यांनी स्पष्ट केले.

निपुण भारत अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शंभर टक्के वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणितीय कौशल्य विकसित करणे हा असल्याचे सांगत, १ ते ५० टक्के प्रगती असलेल्या शाळांनी पुढील दोन महिन्यांत किमान १५ टक्के वाढ साध्य करावी, तर ५० टक्क्यांहून अधिक प्रगती असलेल्या शाळांनी सहा महिन्यांत शंभर टक्के निपुणतेचे लक्ष्य गाठावे, असे आवाहन करण्यात आले.

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 

बैठकीदरम्यान जिल्हा परिषद शाळा निंभोरा येथील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी मीनाक्षी रमेश पारधी व विद्यार्थी विराज प्रमोद कोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या हस्ते दोघांनाही शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

असर अहवालाने वाढवली चिंता

 

केंद्र शासनाच्या निपुण भारत अभियानातून विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व गणितातील मूलभूत कौशल्ये प्राप्त व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू असले तरी असर २०२४ अहवालाने जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे चिंताजनक चित्र समोर आणले आहे.

अहवालानुसार, जिल्ह्यातील इयत्ता तिसरी ते पाचवीतील केवळ २८.७ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या स्तरावरील पाठ वाचता येतो, तर ४०.५ टक्के विद्यार्थ्यांनाच साधे वजाबाकीचे गणित सोडवता येते. इयत्ता सहावी ते आठवी गटातही परिस्थिती समाधानकारक नसून ४५.२ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरील पाठ वाचता येतो, तर फक्त २५.५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता येतो. ही आकडेवारी राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे.

 

प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार व भक्कम प्राथमिक शिक्षण मिळावे

 

“निपुण भारत अभियानाची जबाबदारी केवळ शिक्षकांची नसून संपूर्ण शैक्षणिक यंत्रणेची आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा न दिसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार व भक्कम प्राथमिक शिक्षण मिळावे, यासाठी सर्वांनी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.”

– निलेश पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जळगाव

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *