
एक लाख भाविकांच्या उपस्थितीत अंबरीष ऋषी टेकडीवरील द्वादश यात्रा उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर नगरीतील पवित्र श्री अंबरीषजी ऋषी महाराज टेकडी येथे आषाढ शुद्ध द्वादशी निमित्त रविवारी (दि. २६) पारंपरिक द्वादश यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. रिमझिम पावसात न्हालेल्या हिरव्यागार टेकडीवर सुमारे एक लाख भाविकांनी श्री अंबरीषजी ऋषी महाराज आणि श्री विष्णुदेवाचे दर्शन घेत भक्तिभावाने प्रार्थना केली. भक्ती, वनभोजन, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणारी ही यात्रा यंदाही भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली.
श्री अंबरीषजी ऋषी महाराज मंदिर संस्थान आणि टेकडी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अमळनेर शहरासह तालुका व परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर टेकडी परिसरात धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
धार्मिक परंपरेनुसार श्री अंबरीषजी ऋषी महाराज हे राजघराण्यातील सोळावे गादीपुरुष मानले जातात. हिमालयात कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील टेकडीवर श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकर यांची आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे ही भूमी पावन झाल्याची भाविकांची श्रद्धा असून, दरवर्षी आषाढ शुद्ध द्वादशीला येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते. यात्रेनिमित्त भाविकांनी श्री अंबरीषजी ऋषी महाराज आणि श्री विष्णुदेवाचे दर्शन घेऊन नारळ अर्पण करत मनोभावे प्रार्थना केली. दर्शनानंतर अनेकांनी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह टेकडी परिसरात वनभोजनाचा आनंद लुटला. रविवारची सुटी असल्यामुळे यंदा यात्रेला नेहमीपेक्षा अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. टेकडी परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. भजी, वडापाव, जिलेबी, गोडशेव, पत्रा भजी, बटाटा भजी यांसह अनेक पारंपरिक पदार्थांचा भाविकांनी आस्वाद घेतला. अनेक कुटुंबांनी घरून आणलेल्या दशमी, पराठे, भाकरी, ठेचा आणि अन्य घरगुती पदार्थांसह निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजनाची परंपरा जपली.
यात्रेतील विशेष आकर्षण ठरला तो पारंपरिक लांब फुग्याच्या काकड्यांचा खेळ. टेकडीवरील उंच ठिकाणी उभे राहून वाऱ्याच्या झोतामुळे फुग्यातून निर्माण होणारा कर्कश आवाज अनुभवण्यासाठी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी मोठी गर्दी केली. पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भाविकांनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटला. यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे विजय बाविस्कर परिवाराने टेकडीच्या उंच भागावर उभारलेली २२ फूट उंच भव्य हनुमान मूर्ती होय. भाविकांनी श्री हनुमानाचे दर्शन घेत श्रद्धा व्यक्त केली. भव्य मूर्तीसमोर कुटुंबीयांसह छायाचित्रे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अनेक युवक-युवती नयनरम्य परिसरात रील्स तयार करतानाही दिसून आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकडी ग्रुपने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भाविकांना कचरा परिसरात न टाकता कचराकुंडीत टाकण्याचे आवाहन केले. भाविकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात्रा संपल्यानंतर टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदानातून संपूर्ण परिसरातील कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. गेल्या अनेक वर्षांपासून टेकडी ग्रुपच्या माध्यमातून टेकडी परिसरात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले आहे. भाविकांनी वाहने टेकडीच्या पायथ्याशीच उभी करावीत, वृक्षांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन मंदिर संस्थान आणि टेकडी ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. भक्ती, निसर्ग, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी श्री अंबरीषजी ऋषी महाराज टेकडीची द्वादश यात्रा यंदाही उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे ही यात्रा अमळनेरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरली.

Leave a Reply