जळगावात ‘काव्यजागर’ कवी संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी):समरसता साहित्य परिषद, जळगाव यांच्या वतीने क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिनांक १२ एप्रिल रोजी “काव्यजागर” कवी संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

या संमेलनात सामाजिक आशय, समरसता आणि थोर महापुरुषांच्या कार्यावर आधारित काव्यरचना सादर करण्यात आल्या. सुमारे ३० कवींनी मराठी, हिंदी, अहिराणी तसेच लेवागण बोलीभाषेत उत्कृष्ट कविता आणि गझल सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम कवी वा. ना. आंधळे होते. प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक-चित्रकार राजू बाविस्कर, प्रा. सौ. संध्याताई महाजन, लेखक दीपक तांबोळी, समरसता साहित्य परिषद जळगावचे अध्यक्ष सुभाष मराठे तसेच प्रांत कार्यवाह नरेंद्र निकुंभ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रकाश बारी यांनी करून दिला.यावेळी विशेष सत्कार सोहळ्यात “काळ्यानिळ्या रेषा” या आत्मकथनासाठी २०२५ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक-चित्रकार राजू बाविस्कर यांचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छाऐवजी गुलाबाचे रोप देऊन संमेलनाध्यक्ष वा. ना. आंधळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना राजू बाविस्कर यांनी सांगितले की, “या आत्मकथनात मांडलेला संघर्ष हा केवळ माझा नसून, तो संघर्ष अनुभवलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. त्यामुळे हा पुरस्कारही त्या सर्वांचाच आहे.” त्यांच्या साध्या आणि जमिनीवर राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची झलक त्यांच्या भाषणातून प्रकर्षाने जाणवली.अध्यक्षीय भाषणात वा. ना. आंधळे यांनी आपल्या साहित्य प्रवासाचा आढावा घेत कवींना मार्गदर्शन केले. त्यांनी चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये सांगत अनेक कवींना प्रोत्साहन दिले.प्रा. संध्याताई महाजन यांनी समरसतेवर भाष्य करत “सरस ते साहित्य आणि समरस तो साहित्यिक” या विचारातून विषयाची मांडणी केली. विविध भाषांमधील कविता व गझल सादरीकरणामुळे समरसतेची जाणीव अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.संमेलनात सहभागी सर्व कवींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष मराठे व सौ. मनीषा उपासनी यांनी केले.शेवटी सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवर, कवी, सभागृह संचालक, समरसता परिषदेचे कार्यकर्ते व पत्रकार यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश कुलकर्णी, सुभाष मराठे, मानसी उपासनी, इंदिरा जाधव, डॉ. मनीषा महाजन, देशमाने काका, भिकाभाऊ भोई, प्रभाकर धनगर, रविंद्र सपकाळ, भानुदास चव्हाण, कैलास ठाकूर आदींचे सहकार्य लाभले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *